नवी मुंबई : इन्शुरन्स कंपनीकडून विकत घेतलेल्या अपघातग्रस्त वाहनांचे चोरीच्या वाहनांवर चेसिस इंजिन नंबर छापून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील चौकडीला गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाने अटक केली आहे. या चौकडीने नवी मुंबई व मुंबई परिसरातून तब्बल ७० लाख रुपये किंमतीची चोरलेली १३ वाहने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. या टोळीने केलेले १५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही वाहन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली.गुन्हे शाखा, कक्ष १ च्या अधिकारी व अंमलदारांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता. त्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासणीत पोलिसांनी संशयित आरोपींच्या कारचा नंबर मिळून आला. यानंतर पोलिसांनी वाहन क्रमांकाच्या माध्यमातून आरोपीचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले, त्यावरून आरोपी खारघरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अरशद अमजद अली खान (वय २७) आणि अख्तर अमजद अली खान (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपींनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने डिसेंबर २०२२ मध्ये, तसेच त्यापूर्वी नवी मुंबई परिसरात मोटार कार चोरी केल्याचे कबुल केले.
Navi Mumbai Murder: नवरा-बायकोतील वाद विकोपाला, पंजाबवरुन माणसं बोलावली आणि…पत्नीचं भयंकर कृत्यआरोपींनी दिलेल्या माहितीवरुन, गुन्हे शाखेने शाहीद अख्तर अन्सारी (वय ३०) आणि अब्दुलमाजी मुसाभाई (वय ४२) या साथीदारांनाही अटक केली. या चौकडीच्या चौकशीत त्यांनी नवी मुंबई व मुंबई परिसरातून १५ कार चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांच्याकडे सखोल चौकशी करून तब्बल ७० लाख रुपये किंमतीच्या १३ मोटार कार हस्तगत केल्या.
अशी करायचे चेसिस नंबरची अदलाबदल:
ही टोळी विमा कंपनीकडून अपघातग्रस्त वाहने विकत घ्यायचे. त्यानंतर, अपघातग्रस्त वाहनाचा रंग, इंधनाचा प्रकार, वाहन उत्पादन वर्ष, वाहनाचा प्रकार इत्यादी वर्णनाची मोटार कार चोरी करायचे. त्यानंतर चोरी केलेल्या वाहनावर, विकत घेतलेल्या अपघातग्रस्त वाहनाचे इंजिन नंबर व चेसिस नंबर प्रिंट करून सदरचे वाहन पुन्हा गरजू ग्राहकांना विकत असल्याचे तपासात आढळून आलं आहे.