जालना जिल्ह्यात कुठेच बालविवाह होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली असल्याने जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यात मोठे यश येत आहे. चाईल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकावर बालविवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.तक्रार प्राप्त होताच त्याची माहिती घेऊन मंगळवारी दिनांक १६ मे रोजी परतूर तालुक्यातील कनकवाडी तांडा तसेच जाफराबाद तालुक्यातील म्हसरुळ येथे बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती.
या माहितीची तत्काळ दखल घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी,पोलीस प्रशासन यांना कळविले.दोन्ही ठिकाणी जाऊन माहिती घेत वधू आणि वर यांच्या वयाची खात्री केली असता एका बालिकेचे वय १६ वर्ष आणि एका बालिकेचे वय १४ वर्ष असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
यावेळी संबंधित ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच गाव बाल संरक्षण समिती यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेऊन बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, याबाबत समुपदेशन केले. तसेच बालविवाह करण्यापासून कुटुंबाला परावृत्त करण्यात आले आणि अठरा वर्षे होईपर्यंत मुलीचे लग्न होणार नाही, अशा प्रकारची समज कुटुंबाला देण्यात आली.
दोन्ही मुलींना त्यांच्या आई-वडिलांसह बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने या कुटुंबाचे समुपदेशन केले व बालविवाह करणार नाही याबाबतचे हमीपत्र लिहून घेतले. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, समुपदेशक सुरेखा सातपुते, संबंधित ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, गाव बाल संरक्षण समिती आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी केली.