• Sat. Sep 21st, 2024
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी एसटीच्या ५००० विशेष बसची व्यवस्था; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता एसटी महामंडळाने वारकऱ्यांसाठी राज्यभरातून पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने पंढरपूर यात्रेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी घेतला, त्या वेळी त्यांनी वारीसाठी पाच हजार विशेष बस सोडण्याचे निर्देश दिले. याव्यतिरिक्त वाखरी येथील २७ जूनला होणाऱ्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त बसही उपलब्ध केल्या जाणार आहेत. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे; तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूप घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

विठुरायाची पूजा करायची असेल मोजावे लागतात इतके रुपये, २०२४ पर्यंतच बुकिंग फुल्ल, मंदिर प्रशासनाची भरघोस कमाई

या बैठकीस राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे पाच हजार गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीतर्फे करण्यात आले आहे. मराठवाड्यातून १२००, मुंबई प्रदेशातून ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १०००; तर अमरावती येथून ७०० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

इंद्रायणी काठी धक्कादायक प्रकार, वारकऱ्यांना तीर्थ म्हणून प्यावं लागतंय केमिकलसह सांडपाणी मिश्रीत पाणी…!

भाविकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, आयटीआय महाविद्यालय आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या विशेष एसटी गाड्या २५ जून ते ५ जुलै यादरम्यान धावणार असून वाखरी येथील माउलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed