• Sat. Sep 21st, 2024

राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर

राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयातील विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सोमवारी अखेर मुहूर्त मिळाला. कोविड काळापासून रखडलेल्या या बदल्यांचा निकाल अखेर शिंदे-फडणवीस सरकारने लावल्याने सोमवारी दिवसभर मंत्रालयात या बदल्यांची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे, या बदल्यांच्या यादीत आपला क्रमांक लागतो का, याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली.मंत्रालयात आणि राज्यातील शासकीय कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची तीन वर्षांत बदली करण्याचा निर्णय आहे. मात्र कोव्हिड काळात या बदलांना स्थगिती देण्यात आल्याने जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ या बदल्या रखडल्या होत्या. अखेर या बदल्यांचा मार्ग शिंदे-फडणवीस सरकारने मोकळा केला असून, मंत्रालयातील जवळपास ३२ विभागांत बदल्यांचे सत्र सोमवारपासून सुरू झाले. त्यानुसार सोमवारी जवळपास अडीचशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यविभागाच्या अ गटातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आला.

नवी मुंबई महापालिकेत बदल्यांचे वारे; अधिकाऱ्यांचे विभाग बदलले, जाणून घ्या कुणाची कुठे झाली बदली
अधिकाऱ्यांना दिलासा

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य विभागाच्या अ गटातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केलेल्या यादीनुसार जवळपास दोनशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई आणि लातूर विभागाचा समावेश आहे. तर गट ब श्रेणीतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय समाजकल्याण विभागातीलही काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. या बदल्यांसाठी अनेक अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून देव पाण्यात ठेवले होते. अखेर या बदल्यांचा निर्णय जाहीर केल्याने अनेक अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed