जिल्ह्यातील माजलगाव शहरात सराफांची अनेक दुकानं आहेत. या दुकानांमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने बनवून दिले जातात. हे दागिने डिझाईनमध्ये तयार करणारे काही बंगाली कारागिर देखील माजलगाव शहरात आपलं बस्तान मांडून आहेत. प्रत्येक सराफा ग्राहकाच्या मागणीनुसार डिझाईन करून देण्याचं ठरवतो आणि ती डिझाईन या बंगाली कारागिरांकडून करून घेतली जाते. या बदल्यात त्यांना मोबदला दिला जातो. एका बंगाली कारागिराने गेल्या आठ वर्षापासून माजलगावमध्ये बस्थान मांडलेलं आहे. यामध्ये या कारागिराने येथील सर्व व्यापाऱ्यांचा विश्वास संपादित केला होता. दोन दिवसांपूर्वी शहरातील पाच व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या डिझाइनचे दागिने तयार करण्यास या बंगाली कारागिराला जवळपास अर्धा किलोहून अधिक सोनं दिलं होतं.
या सोन्याची किंमत जवळपास ३० लाखाहून अधिक आहे. मात्र या बंगाली कारागिराने या पाचही सराफाच्या सोन्यावर डिझाईन केलीच नाही. त्याने सोने घेऊन पलायन केलं. बंगाली बाबा अचानक फरार झाल्याची माहिती या व्यापाऱ्यांना मिळाली. त्यांनी नियमित ठिकाणी जाऊन बाबाची चौकशी केली, पण बाबाने आपल्या हातावर तुरी दिल्याचं सराफांच्या लक्षात आलं. त्यांनी माजलगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि याविषयी तक्रार दिली.
यामध्ये काही सराफा व्यापाऱ्यांनी हा बंगाली कारागिर पकडवा जावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पोस्ट केल्या. या पोस्टमुळे जिल्ह्यात सराफा असोसिएशमध्ये एकच खळबळ उडालीये. या सोन्याची किंमत तीस लाखाहून अधिक असल्याने आणि बंगाली कारागिरावर आंधळेपणाने विश्वास ठेवल्याने तीस लाखापर्यंतचा फटका या सराफी व्यापाऱ्यांना बसला आहे.
रविवारी उशिरा व्यापारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी सोन्याच्या पावत्या मागितल्याने हे सराफी व्यापारी परत पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा तिकडे फिरकलेच नसल्याची चर्चा होत आहे. मात्र सध्या जिल्हाभरात अनेक बंगाली कारागीर आहेत आणि यांच्याकडे बहुतांश सराफा दुकानदार दागिन्यांना डिझाईन विविध प्रकारे दागिने हे तयार करण्यासाठी देतात आणि त्यांच्याकडून लवकरात लवकर हे दागिने तयार करून मिळतात. यामुळे सराफांचा कल देखील या बंगाली कारागिरांकडे जास्त राहतो.