किये येथे ४५ वर्षीय इसमावर चाकू आणि हॉकी स्टीकने हल्ला करण्यात आला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात काशिनाथ रमाकांत मालुसरे वय – ४५ रा.कीये, डांब्याची वाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु काशिनाथ मालुसरे यांच्या गुडघ्याला आणि अंगठ्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना मुंबई येथे पुढील उपचाराकरता हलवण्यात आलं आहे.
संशयित हल्लेखोर रामदास तुकाराम सणस, जानू धोंडीराम मालुसरे, सागर बारकु मालुसरे अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावं आहेत. हे संशयित आरोपी हल्ला करून फरार झाले होते. पळालेल्या या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात महाड एमायडीसी पोलिसांना यश आलं आहे. मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात ठेऊन हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सदर आरोपींविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिद्धार्थ मोरे करत आहेत. एकाच आठवड्यामध्ये तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जीवघेणे हल्ले करून दहशत पसरवणाऱ्यांना महाड पोलिसांनी तात्काळ पायबंद घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.