याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत अनिकेत शिंदे( वय २९) हा शहरातील स्टेशन परिसरात आपल्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी आला होता. सोहळा आटपून तो पुन्हा टिटवाळा येथे जाण्याच्या तयारीत असताना अनिकेतचा मोठा साडू संदीप शांताराम निकाळे( रा. बदलापूर जि.ठाणे ) याने अनिकेतला, तू माझी बाजू का घेत नाही? माझ्या सासरची बाजू का घेतो असा सवाल केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला या अगोदर देखील दोघांमध्ये अनेकदा वादविवाद झाले होते.
दरम्यान , शनिवारी मध्यरात्री संदिप याने आपल्या सोबत विशाल शांताराम निकाळे( रा. बदलापूर) सागर सोनवणे( रा. गोंदे दुमाला) , अमोल पवार( कुऱ्हेगाव , ता. इगतपुरी ) यांना साडू अनिकेतला फोन करायचा आहे असे सांगून त्यांना बोलावून घेत दारू पाजली. त्यानंतर साडू अनिकेत यास फोन लावून चंद्र फाटा येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यासोबत वाद घालत, सासरची बाजू का घेतो? माझी बाजू का घेत नाही? असे म्हणत हातात असलेल्या लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने तसेच लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनिकेतच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याने मोठ्या प्रमणात रक्तस्राव झाला. अनिकेतला जखमी अवस्थेत रोडच्या बाजूला टाकून संदीप व त्याचे साथीदार तिथून फरार झाले.
या घटनेची माहिती मिळताच अनिकेतचे मेहुणे गणेश जगताप व त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अनिकेत यास घोटी ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आरोपी संदीप निकाळे हा सराईत गुन्हेगार असून सध्या फरार झाला आहे. अधिक तपास घोटी पोलीस करत आहेत.