• Sat. Sep 21st, 2024
मुंबईतील समुद्रात दिसायला लागले ‘हे’ मासे; मच्छिमारांना पावसाबाबत मिळाले महत्त्वाचे संकेत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: वाढत्या उष्म्याचा तडाखा अन्य सजीवांप्रमाणेच समुद्रातील माशांनाही बसत असल्याचे दिसत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मासेमारीवर झाला असून पावसाळ्यातील बंदीचा कालावधी लागू होण्यापूर्वीच मासेमारी ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे ताज्या माशांसह पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी जे मासे लागतात त्यांची उपलब्धता कुठून करायची असा प्रश्न आता कोळी समाजापुढे उभा ठाकला आहे.

प्रत्येक वर्षी या दिवसांमध्ये सुरमई, रावस, करंदी, तारल्यांची रेलचेल असते. यंदा मात्र हे मासे नावाला उरले आहेत. छोट्या आकाराची पापलेट मिळतात, पण त्यांना फारशी चव नसते. बोंबिलही जाळ्यात सापडत नाहीत. वातावरणातील बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. १ जूनपासून मासेमारी बंद होईल. यंदा एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने कोरडे गेल्यामुळे मच्छिमारांची चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यात खूप मासे मिळतात. ताज्या माशांसह सुक्या मासळीचीही पावसाळ्यातील दिवसांसाठी बेगमी करण्यात येते. उन्हाळा कडक असला तरीही मासे नसल्यामुळे पावसाळ्यातील दिवसांमध्ये काय करावे, असा प्रश्न मासेमारी आणि विक्री या व्यवसायात असलेल्या हर्षा टपके यांनी उपस्थित केला.

बाजारातून मासे आणले, घरी येऊन शिजवले, एक तासानंतर महिलेचा मृत्यू, पती कोमात, काय घडलं नेमकं?

वातावरणातील बदलाचा परिणाम मासेमारीवर मोठ्या प्रमाणात होतो. त्याचा विचार व्हायला हवा. सरकार शेतीच्या संदर्भात जितक्या गांभीर्याने विचार करते तितक्या गांभीर्याने मासेमारीबद्दल विचार केला जात नाही. वातावरणामध्ये झालेले बदल मासेमारीसाठी पूरक ठरत नाहीत. बाह्यघटकांचा समुद्री जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अनुभवी कोळी बांधवांना सोबत घेऊन विशेष समिती स्थापन करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. हीच परिस्थिती राहिली तर यापुढील काळात मासेमारीकडे मुख्य व्यवसाय म्हणून कसे पाहावे, ही चिंता सतावत असल्याचे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी सांगितले.

पावसाळा जवळ आल्याची खूण

निवटा, कालेटा या माशांचे दर्शन व्हायला लागले की पावसाळा जवळ आल्याचा इशारा कोळ्यांना मिळतो असे जाणकार सांगतात. आता या माशांचे दर्शन होत असून मासेमारी मुदतीपूर्वीच बंद करावी का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

वादळानंतर वातावरण बदललं; आभाळातून चक्क माशांचा पाऊस; रस्त्यांवर माशांचा खच

बर्फाची किंमत वाढली

साठवणूक आणि बर्फ या दोन्हींच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून वाढत्या तापमानामुळे बर्फाची गरजही वाढती आहे. साठवणूक करण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कोळी समाजाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed