• Thu. Nov 28th, 2024
    कर्नाटक जिंकलं, मविआ नेत्यांची दुसऱ्याच दिवशी बैठक, २०२४ चं गणित ठरलं

    मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याचा निर्णय आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.कर्नाटकच्या विजयानंतरच्या दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी मविआ नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला स्वत: शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संजय राऊत, आदी नेते उपस्थित होते. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    जागावाटपावर लवकरच चर्चा

    भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. याशिवाय महाविकास आघाडीचे एकत्रित संघटन व ठाम पर्याय महाराष्ट्राला सक्षमपणे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे यावर एकमत आजच्या बैठकीत झाल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरुन अधिक मोठ्या संख्येने आणि ताकदीने महाविकास आघाडी पुढच्या काळात काम करेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

    अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा लवकर निर्णय घ्यावा

    सुप्रीम कोर्टात जो निर्णय झाला त्याचा तपशील आपण वाचला आहे. सुप्रीम कोर्टाने मर्यादा घालून विधानसभा अध्यक्षाना निर्णय घेण्याची जबाबदारी दिली आहे. लवकरात लवकर निर्णय द्यावा असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यादृष्टीने विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed