इतकंच नाही तर पतीच्या निधनानंतर आपल्या दोन मुलांचाही उत्तमपणे सांभाळ करत त्यांना योग्य प्रकारे शिक्षण दिलं. आज त्यांचं घर सुरुळीत सुरू आहे, पण जेव्हा त्यांच्यावर वेळ आली त्यावेळी एकही नातेवाईक किंवा इतर कोणी फारसं मदतीला पुढे धावलं नाही. पण जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या संसाराचा गाडा उत्तम प्रकारे संभाळला. कोणत्याही परिस्थितीत मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं अशी त्यांची जिद्द होती. वेळप्रसंगी त्यांनी उपवासही सहन केला. कधी कधी उपाशी राहण्याची वेळ येत होती, अगदी मुलांनाही दोन पोळया खाऊन झोपण्याची वेळ आली.
१९८६ साली लग्न झालं. लग्न झाल्यापासून पती फार लक्ष देत नव्हते. रत्नप्रभा मांडवकर संसाराचा गाडा पहिल्यापासूनच एकटीने हाकत होत्या. अगदी अनेकदा आत्महत्या करावी असाही भयानक विचार त्यांच्या मनात येऊन गेला. मात्र मुलांकडे बघून मी कधीही अनुचित पाऊल उचललं नाही, अशीही विदारक आठवण रत्नप्रभाताईंनी सांगितली.
या काळात डोक्यावर असलेलं छप्परही धड नव्हतं. पावसात घरात जमिनीवर ओल येत असल्याने पावसात प्लास्टिक टाकून त्यावर झोपावं लागत होतं. पण आपल्या या सगळ्या परिस्थितीची जाणीव दोन्ही मुलांना होती. दोन्ही मुलांचा संभाळ करत त्यांना वेळवी येथील आपल्या माहेरीही लक्ष द्यावं लागत होतं. रत्नप्रभा यांच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. वडीलही आजारी होते, त्यामुळे माहेरीही त्यांना लक्ष द्यावं लागत होतं. ही सगळी कसरत त्या एकट्या संभाळत होत्या.
मोलमजुरी, धुणीभांडी करून महिन्याचा पगार झाला की मुलांच्या शाळेची फी द्यावी लागायची. परिस्थिती नसल्याने दहावीला मुलीला क्लास लावता आला नाही. इतकंच नाही, तर शाळेत जाण्यासाठी तिला साधी सायकल घेणंही शक्य नव्हतं. पण त्याही परिस्थितीत दोन्ही मुलं शिकली. मुलगी प्रतिमा चांगल्या मार्काने पास झाली, बारावी झाली तिला बीकॉम, एम कॉमपर्यंत शिकवलं. कंम्प्यूटरचा कोर्स, टॅली असे कोर्सही तिने केले. त्यानंतर तिने काही काळ नोकरी केली. त्यानंतर तिचं लग्न करून दिलं. तिचा पती बँकेत असून लेकीचा संसार उत्तम चालला आहे.
मुलांना चांगलं शिक्षण देण्याची त्यांनी जिद्द बाळगली होती. मुलगा प्रथमेश याने बारावीपर्यंत शिक्षण केल्यानंतर चिपळूण सावर्डे येथे निकम यांच्या शिक्षण संस्थेत टू व्हिलर मॅकेनिक कोर्स केला. त्यानंतर तो मुंबईतही आला होता, पण तिकडे फार जम न बसल्याने त्यांनी मुलाला गावी बोलावून घेतलं. दापोली येथे त्याला दुचाकी रिपेरिंगचं गॅरेज टाकण्यासाठी मदत करत त्याला स्वबळावर उभं केलं. हे सगळं करत असताना मुलांची शिक्षण पूर्ण करत त्यांनी आता स्वतःचं घरही दुरुस्त केलं आहे. या सगळ्या हलाखीच्या परिस्थितीत कोणाचीच साथ नसताना रत्नप्रभाताईंनी स्वत:च्या हिमतीने, जिद्दीने संपूर्ण घर सावरलं.