आज २६ वर्षानंतर सगळ्या मुलांचे संसार उत्तम चाललेले पाहून त्या समाधानी आहेत. सुना जावई, नातवंडं असा मोठा परिवार आहे. पतीचं निधन झालं, त्यावेळी एक मुलगा पहिलीत होता, तर दुसरा इयत्ता तिसरीमध्ये होता. भावंडांमध्ये सर्वात लहान असलेली सविता ही मुलगी एक वर्षाची होती. पतीच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन मोठ्या मुलींच्या झालेल्या लग्नाचं कर्जही आनंदीबाईंच्या डोक्यावर होतं. पण पदरी असलेल्या मुलांना खाण्या-पिण्याची कसलीच आबाळ होऊ द्यायची नाही अशी जिद्द आनंदीबाईंनी बाळगली होती.
या ही परिस्थितीत त्यांना जमेल तसं शिक्षण द्यायचं असा त्यांचा प्रयत्न होता. स्वतःची शेती सांभाळत मोल – मजुरी करत या तिन्ही मुलांची शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत पूर्ण केली. आपल्या घरची हलाखीची परिस्थिती पाहून दोन मुलांनी सातवीनंतर मुंबई येथे नशीब आजवण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीत अनेक अडचणी येऊनही या सगळ्यावर मात करत त्यांनी घरही बांधलं.
पण आपण ज्या ज्या प्रसंगातून आजवर गेलो त्या वेळी आपल्याला कोणाचीच मदत नव्हती, कोणाचीही साथ मिळाली नाही अशी खंत आनंदीबाई व्यक्त करतात. आज त्यांच्या दोन्ही मुलांचं मुंबई गोरेगाव परिसरात स्वतःचं घर आहे. दोघांचेही संसार उत्तम सुरू असल्याचं आनंदीताईंना समाधान आहे.