किशोर आवारेंच्या खून प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह ७ जणांविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सुनील शेळके यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. आम्ही राजकारणात काम करत असताना आमच्यात मतभेद होते पण मनभेद नव्हते, असं सांगताना आरोपींना कठोरात कठोर शासन करावं, अशी त्यांनी मागणी केलीये.
प्रवीण उर्फ रघुनाथ धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे (रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेश मंदिराजवळ, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना आज वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-२ च्या पोलिसांनी संदीप विठ्ठल मोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
आमदार सुनील शेळके काय म्हणाले?
किशोर आवारे आणि मी राजकारणात एकत्र काम केलंय. आमच्यात मतभेद होते, पण मनभेद नव्हते. परंतु, काही मंडळी जाणीवपूर्व राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण न्यायदेवता आणि पोलीस सत्यता समाजासमोर आणतील. मी, माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा या खून प्रकरणात आरोप आहे. एखाद्याची हत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या भावना तीव्र असतात. मला हे माहिती आहे. पण यामागे कोण सूत्रधार आहे, हे सगळं कोण घडवत आहेत, याचा शोध आम्ही घेऊ, असं सुनील शेळके म्हणाले.