या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यामधील मौजे खेड नांदगिरी (ता. कोरेगाव) येथील झरा शिवार जमिन गट नं. ६८४ मध्ये तहसीलदारांच्या आदेशाने रस्त्याच्या कब्जा पट्टीची अंमलबजावणी सुरू असताना जमिनीतून रस्ता नेण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. “उभ्या पिकातून जेसीबी घालायचा नाही”, असं सांगत शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी दोन कुटुंबांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस, महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी ही भांडणे सोडवली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून कोरेगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
तेजस उदयसिंह कदम, विठ्ठल प्रफुल्ल कदम, संदिप चंद्रकांत कदम, सारंगनाथ रामचंद्र कदम, रोहित रविंद्र कदम, सचिन बबन कदम, बबन गणपती कदम, रविंद्र रामचंद्र कदम, प्रफुल्ल गणपत कदम (सर्व रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव) व शुभम सुरेश गोळे (रा. तडवळे, ता. कोरेगाव) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून “आम्ही तुम्हाला येथून जावून देणार नाही, तसेच तुम्ही आमच्या शेतात पाय ठेवला, तर हात पाय काढीन. तुम्हाला जीवंत सोडणार नाही”, अशी धमकी देवून शिवीगाळ करून तक्रारदार अर्जुन कदम, पुतणे सागर सत्यवान कदम, प्रतिक कमलसिंग कदम यांना हाताने, लाथाबुक्कयांनी मारहाण केली आहे, अशी तक्रार अर्जुन विनायक कदम (वय ५९, रा. खेड नांदगिरी) यांनी दिली आहे.
अर्जुन विनायक कदम, कमलसिंग विनायक कदम, वैभव अर्जुन कदम, सागर सत्यवान कदम यांनी “आम्ही आता उभ्या पिकातून जेसीबी घालून जमिनीतून रस्ता बनवणार आहे” असे म्हणाले. त्यावेळी तक्रारदार तेजस कदम, चुलते राजेंद्र दशरथ कदम, सारंग रामचंद्र कदम, चुलती शारदा प्रफुल कदम यांनी” त्यांना “तुम्ही उभ्या पिकातून जेसीबी घालायचा नाही”, असं म्हणाल्याचा राग मनात धरून अर्जुन विनायक कदम, सत्यवान विनायक कदम, कमलसिंग विनायक कदम, विजय विनायक कदम, वैभव अर्जुन कदम, सागर सत्यवान कदम, अक्षय कमलसिंग कदम, प्रतिक कमलसिंग कदम, प्रणव विजय कदम, संपत श्रीरंग कदम, विशाल संपत कदम, शेखर गणेश कदम यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून धमकी देवून भांडण केले, अशी तक्रार तेजस उदयसिंग कदम (वय ३०, रा. खेड नांदगिरी) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
या परस्पर विरोधी दाखल झालेल्या प्रकरणाची कोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत तपास करीत आहेत.