महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी (उद्या) सकाळी लागणार आहे. तसे संकेतच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, राज्यपालांचा बहुमत चाचणीचा आदेश, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचे कार्यक्षेत्र अशा सगळ्या मुद्द्यांवर गेली साडे आठ महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाने दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतले. घटनापीठातील एक न्यायमुर्ती १५ मे रोजी निवृत्त होत असल्याने उद्याच निकाल लागणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलंय. तत्पूर्वी राजकीय वर्तुळातून या निकालावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
सत्तासंघर्षाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले, आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल, सरकार जाईल, या गोष्टी राजकारणात घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल. पाकिस्तानात त्यांचं संविधान जळताना दिसतंय. आपलं दुश्मन राष्ट्र जरी असलं तरी आज तो देश जळतोय, कारण देश संविधानानुसार चालत नाही. कायद्यानुसार आणि संविधानुसार भारत चालणार की नाही, याचा फैसला उद्या होणार आहे, असं राऊत म्हणाले.
न्यायपालिका कुणाच्या दबावाखाली काम करत नसेल तर उद्या न्याय होईल
क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर डॉ. आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. देशात जर कायदा उरला असेल आणि न्यायपालिका कुणाच्या दबावाखाली काम करत नसेल तर उद्या न्याय होईल, अशी तिरकस प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
“विजय आमचाच होईल, असं शिंदे गटाच्या काही नेत्यांचा दावा आहे. जर ते वारंवार असा दावा करत असतील तर याचा अर्थ काहींनी गडबड केलीये पण आम्ही आशावादी आहोत. निकाल आमच्या बाजूने लागेल असा आमचा दावा नाहीये, आम्ही असं म्हणतोय की संविधानाचा-घटनेचा विजय होईल. पण मला खात्री आहे देशाचं सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे”, असं राऊत म्हणाले.
सत्ता संघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले-मी तुम्हाला हात जोडतो
उद्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारताच त्यांनी मी तुम्हाला हात जोडतो, असं म्हणत याविषयी बोलणी टाळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आमदार लता सोनवणे यांच्या लेकीच्या विवाहासाठी जळगावात आले होते. विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला.