• Sun. Sep 22nd, 2024

जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कृषी पुरक उद्योगांचे क्लस्टर निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

ByMH LIVE NEWS

May 10, 2023
जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कृषी पुरक उद्योगांचे क्लस्टर निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 10 मे 2023 (जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या निमित्ताने या दोन राज्यांतील बाजारपेठांचा सांधा म्हणून नंदुरबार जिल्ह्याकडे पाहिले जाते, त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पादन व कृषी पुरक उद्योगांचे क्लस्टर विकसित करणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

या संदर्भात स्वतंत्र बैठक घेवून त्याबातचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. या संदर्भात बोलताना डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार हा कृषीप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध प्रकारच्या कृषी उत्पादन वाढीसाठी पोषक अशी पार्श्वभुमी व भौगोलिक क्षमता आहेत. या क्षमता अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानातून अधिक बळकट करून प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र शेती पुरक उत्पादन व व्यवसायांचे क्लस्टर निर्माण करणार आहे.

जिल्ह्यात विविध तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यात शहादा तालुक्यात केळी आणि पपईसाठी मोठा वाव असून अक्कलकुवा तालुक्यात आंबा-आमचूर व सीताफळ उत्पादनाचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी वाव आहे. नवापूर तालुक्यात लाल तूर (जीआय टॅग) व भाजीपाला, नंदुरबार लाल मिरची, धडगावमध्ये आंबा-आमचूर, लसूण, सामान्य कडधान्ये तर तळोदा तालुक्यात केळी आणि पपई उत्पादनाचे क्लस्टर निर्मितीसाठी मोठा वाव आहे, असेही डॉ. गावित यांनी सांगितले.

तालुकानिहाय क्लस्टर निर्माण केल्याने शेतकऱ्याच्या शेतमालाला जागेवरच मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून गुजरात व मध्यप्रदेश सारख्या राज्यांच्या लगत असल्याने कृषी पुरक उद्योगधद्यात आंतरराज्य निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे, असेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात शेती क्लस्टर

✅ शहादा – केळी, पपई

✅ अक्कलकुवा –  सीताफळ, आंबा-आमचूर

✅ नवापूर – लाल ग्रामतूर आणि भाजीपाला

✅ नंदुरबार – लाल मीरची

✅ धडगाव – आंबा- आमचूर, लसूण व सामान्य तृणधान्य

✅ तळोदा – केळी आणि पपई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed