• Tue. Nov 26th, 2024

    ‘अल निनो’चा विचार करून धान रोवणी व पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    May 10, 2023
    ‘अल निनो’चा विचार करून धान रोवणी व पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    धान खरेदीबाबत पुढील आठवडयात भंडाऱ्यात बैठक

    भंडारा, दि. 10 : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यावर्षी मान्सुनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र यावर्षी अल निनोचा  विचार करून धान रोवणी व  पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

    नियोजन सभागृहात श्री. फडणवीस यांनी जिल्ह्याचा खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संगीता माने यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

    शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी आरबीआयच्या निर्देशानुसार पीक कर्ज मिळाले पाहिजे. त्यात सिबील स्कोरचे निकष बॅंकानी लावू नयेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील धान खरेदी, भरडाई व अन्य अडचणीबाबत लवकरच अन्न व नागरी पुरवठा मंत्री व सचिव हे जिल्ह्यात सविस्तर बैठक घेतील, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    भंडारा जिल्ह्यात खतांच्या उपलब्धतेसाठी रेल्वेच्या रेक पॉईंटची व्यवहार्यता तपासण्यासाठी तुमसर येथे लोकप्रतिनीधी व जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून तसा अहवाल तातडीने शासनास देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    जलयुक्त शिवार योजना ही राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडलेल्या शंभर गावातील कामांना गती देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. जलयुक्त शिवारच्या कामासाठी 29 कोटी निधीची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. आतंरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्यांच्या पौष्टिक पाककृतींचे प्रशिक्षण महिला बचतगटांना देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.

    बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण केले. खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे बि-बियाणे, रासायनिक खते व अन्य कृषि निविष्ठा शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिले.

    कृषी पंपाकरीता राज्य विज वितरण कंपनीने प्रलंबित वीज कनेक्शन संख्या (पेड पेन्डींग) 30 जूनपर्यंत निकाली काढावी. शेतीपंपांना दिवसा अखंडीत वीज पुरवठा  होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी हा  कालबद्ध कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावा. तसेच लोकप्रतिनीधींनी देखील या योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठी  तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    जिल्ह्याचे खरीप नियोजन

    जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण 2 लाख 6 हजार 552 हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक 1 लाख 88 हजार 263 हेक्टरवर भात पिकाचे नियोजन आहे. तर इतर पिकांमध्ये मका, तूर, सोयाबीन, तिळ, आले, हळद, भाजीपाला, कापूस, उस, यांची पेरणी होणार आहे.

    सन 2023-24 मध्ये पिकांकरिता जिल्ह्यातील एकूण प्रस्तावित नियोजनाप्रमाणे भातासाठी 45 हजार 183 क्विंटल, तुरीसाठी 488 क्विंटल, सोयाबीनसाठी 631 क्विंटल तर कापसासाठी 18 क्विंटल बियाणे जिल्ह्याला लागणार आहे. खरीपाच्या नियोजनानुसार एकूण 89 हजार 318 मेट्रीक टन इतकी विविध प्रकारच्या खतांची मागणी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

    तुमसर व मोहाडी तहसीलच्या प्रशासकीय इमारतीचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण पालकमंत्री श्री.फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed