इलेक्ट्रिक मोटार लावताना विजेचा जोरदार धक्का
सकाळी साडे नऊ दरम्यान नळाला पाणी आले होते. आठवड्यातून एकदा आणि त्यातही कमी दाबाने पाणी येत असल्याने शांतराज तिल्लारे याने पाणी उपसा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी विजेचा जोरदार धक्का बसला आणि शांतराज निपचित अवस्थेत नळाच्या बाजूला पडला. आईने ताबडतोब वीज प्रवाह बंद करून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
आठ वर्षांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. काही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे, काँग्रेस नेते प्राध्यापक नरसिंह आसादे, काँग्रेसचे माजी युवकाध्यक्ष अंबादास करगुळे, हणमंतु सायबोळू यांच्यासह अनेक नागरिक दाखल झाले. महानगरपालिका पाणीपुरवठा विभागावर संताप व्यक्त केला.
शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा
२० लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहराला गेल्या अनेक वर्षांपासून आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो. उजनी ते सोलापूर शहर समांतर जलवाहिनीचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले आहे. विस्कळीत पाणीपुरवठा किंवा महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या मुलाचा जीव गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मृत मुलाच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेकडून शासकीय मदत मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.