भाजपने फौजदाराचा हवालदार केला!
कर्नाटक विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत. निपाणी येथे झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणणाऱ्याला भाजपने फौजदाराचा हवालदार केलं आणि हा आता आमची माप काढत आहे. त्याला स्वतःचे स्थान टिकवता आलं नाही, असा पलटवार जयंतरावांनी केला.
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आमचं चांगलं चाललेलं सरकार फोडण्याचे पाप केलं. आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल असं त्यांना वाटत होतं मात्र दिल्लीने दुसऱ्यालाच मुख्यमंत्री पद दिले. स्वत:चं स्थान टिकवता आलं नाही, त्यांनी दुसऱ्याला शहाणपणा शिकवू नये, असं म्हणत जयंतरावांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.
अजितदादांचं फडणवीसांना उत्तर
आमच्या पक्षावर किंवा पक्षातल्या लोकांची फडणवीसांनी चिंता करण्याचं काही कारण नाही. त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांकडे पाहावं. आम्ही जर साडे तीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असू तर तुम्ही चिंता कशाला करता, आम्हाला का घाबरता, असा सवाल अजित पवार यांनी फडणवीसांना विचारला.
फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस गेले काही दिवस कर्नाटक प्रचारात होते. त्यावेळी सीमाभागात प्रचार करताना तसेच राष्ट्रवादीला लक्ष्य करताना फडणवीस म्हणाले, राषअट्रवादी हा केवळ साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, ते कर्नाटकात काय करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो. काँग्रेस आता राहिलेच नाही.. अशी टीका फडणवीस यांनी केली.