याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील शेतकरी जगदीश भास्कर वाटपाडे (वय ३४) राहणार पाचोरे वणी हे आपल्या शेतातील तळ्याच्या पाणी ओढणाऱ्या मोटारीची दुरुस्ती करत असताना अचानकपणे त्यांचा पाय घसरला. त्यामुळे ते शेततळ्यात पडले आणि पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पावली येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जगदीश यांना पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून जगदीश वाटपाडे यांना मयत घोषित केले आणि शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी बाराहाते करत आहेत.
दरम्यान, शेततळ्यातील पाणी ओढणाऱ्या मोटारीच्या दुरुस्तीचे काम करत असताना ही घटना घडल्याने ३४ वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण नादुरुस्त मोटर ठरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वाटपाडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
निफाड तालुक्यात मागच्या काही दिवसांपूर्वी देखील सकाळी सहा वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेलेल्या ऋतिका गोकुळ फड या १६ वर्षीय मुलीचा पाय घसरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा दुर्दैवाने निफाड तालुक्यातील तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे.