छत्रपती संभाजीनगर : मेस पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे थकवल्याच्या कारणावरून संस्थेच्या काही लोकांनी चक्क समृद्धी महामार्ग बंद पडला आहे. टोलनाक्यावरती वाहने लावण्यात आली. यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अडीच तास हा गोंधळ सुरू होता. समृद्धी महामार्गाची वाहतूक बंद केल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. वाहतुकीची कोंडी सुटत नसल्यामुळे नागरिक संतप्त आहेत.लांबचा प्रवास सुकर आणि कमी वेळेत हवा यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा महामार्ग तयार करण्यात आला. जेणेकरून लांबचा प्रवास सुकर आणि कमी वेळेत होईल, असा यामागचा उद्देश होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग यांना त्या कारणावरून चर्चेत येत आहे. पाच मे रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे समृद्धी महामार्गावर साचलेले पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात पोहोचलं. त्यामुळे शेतात जवळपास तीन फूट पाणी साचलं. शेतकऱ्याने शेतात पिकवलेले कांदे या पाण्यामुळे भिजले आणि यामुळे संतप्त शेतकऱ्याने स्वतःचा ट्रॅक्टर समृद्धी महामार्गावर आडवा लावत रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असताना दुसरी घटना आता समोर आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या जांबरगाव येथे समृद्धी महामार्गावर टोलनाका आहे. या टोलनाक्यावरती अनेक कर्मचारी काम करतात. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एका संस्थेच्या माध्यमातून जेवणाचे डबे पुरवले जातात. त्यासोबतच एका संस्थेकडून या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ने आण करण्यासाठी वाहने पुरवली जातात. मात्र या संस्थांचे वारंवार मागणी करुनही पैसे दिले गेले नसल्याने संतप्त झालेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी थेट टोलनाकाच बंद पडला. यासोबतच रस्त्यावर वाहने देखील आडवी लावण्यात आली.नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस वाहनधारकांची गर्दी वाढत आहे. मात्र अचानक बंद करण्यात आलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली. यामुळे काही वाहनधारकांनी यासंदर्भात टोल नाक्याच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. मात्र त्यांच्याकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.