• Mon. Nov 25th, 2024

    हुकूमशाहीने कोकणावर रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू: उद्धव ठाकरे

    हुकूमशाहीने कोकणावर रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू: उद्धव ठाकरे

    रत्नागिरी: बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण सरकारने हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही तोडून-मोडून टाकेन. आम्ही महाराष्ट्र पेटवू, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. ते शनिवारी राजापूरच्या सोलगाव येथील रिफायनरी विरोधक ग्रामस्थांना भेटले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी या ग्रामस्थांशी संवाद साधला. सोलगाव-बारसू रिफायनरीविरोधातील लढ्यात आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले. तुम्ही काळजी करु नका. कोकणात लोकांचे मुडदे पाडून मी विकास होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

    कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार, समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी; हजारो रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता

    बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी मी पत्र दिले होते. पण त्याचा अर्थ याचठिकाणी प्रकल्प करा, असा होत नाही. लोक भिकारी झाले तरी चालतील, पण रिफायनरी करा, असे मी बोललो होतो का? नाणार प्रकल्पाला आम्ही विरोध केला होता. बारसूमध्येही माणसं राहतात, याठिकाणीही आंबा आणि काजूच्या बागा आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांना ही रिफायनरी नको असेल तर हा प्रकल्प होता कामा नये, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

    Ratnagiri News: बारसू रिफायनरीविरोधातील लढ्याला मुंबईतून रसद, चाकरमानी तरुण कोकणाकडे निघाले

    एकनाथ शिंदेंना तीन जिल्हे तरी ओळखत होते का; उद्धव ठाकरेंची टीका

    सध्याच्या मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. मी त्यांचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की, समृद्धी महामार्गावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन आम्ही मार्ग काढला होता. समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन जिल्हेही मंत्री म्हणून ओळखत नव्हते. आज ३३ देशांत गद्दार म्हणून त्यांची ओळख आहे. समृद्धी महामार्गाच्यावेळी मी छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात गेलो होतो. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागा दाखवल्या. या शेतांमधील झाडं फळांनी लगडलेली होती. तेव्हा शेतकऱ्यांशी बोलून आम्ही समृद्धी महामार्गाचा रस्ता पलीकडून नेला आणि त्यांच्या फळबागा वाचवल्या. अशाप्रकारे लोकांशी बोलून मार्ग काढावा लागतो. सरकारला रिफायनरी आणायची असेल, पण स्थानिक लोकांचा विरोध असेल तर येथे रिफायनरी येता कामा नये. मी राज्य सरकारला आव्हान देतो की, त्यांनी माझ्याप्रमाणे लोकांसमोर उभे राहून बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करुन दाखवावे. चांगल्या प्रकल्पांना विरोध करायला कोकणी माणूस मुर्ख नाही. पण राखरांगोळी करणारे विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारले जात असतील तर तो प्रयत्न खपवून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed