देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये गेले होते. हा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचले होते. याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी भगवान श्री नृसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर एक छोटेखानी सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीराव पाटील यांना उद्देशून म्हटले की, “पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवतच नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे साहजिकच चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार का, याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या दोन महत्त्वाच्या भेटी सध्या चर्चेचा विषय आहेत. केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी नुकतीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास पुढे काय पावले उचलायची, तसेच नवी राजकीय आघाडी आकाराला आल्यास कोणत्या पद्धतीने नियोजन करायचे, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. याशिवाय, गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. ही भेट केवळ स्नेहभोजनाच्या निमित्ताने असल्याचे सांगण्यात आले. परंतु, सध्याचे राजकीय वातावरण पाहता मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
फडणवीसांच्या मनात काय हे सांगण कठीण, पटोलेंचं अजब विधान