महाविकास आघाडीची विराट वज्रमूठ सभा आज बीकेसीच्या मैदानात पार पडली. या सभेला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात बारसू, मुंबई महापालिका, कर्नाटक निवडणूक अशा मुद्द्यांवर भाष्य करतानात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
६ तारखेला बारसूला जाणार, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, अडवून दाखवा
बारसूबद्दल मी ६ तारखेला जाऊन तेथील लोकांशी भेटून बोलणार. तो माझ्या महाराष्ट्राचा भाग आहे. मी जागा सुचवली होती पण माझ्या पत्रात लोकांवर अत्याचार करा असं लिहिलं होतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. जेव्हा मविआ सत्तेत होती तेव्हा माझ्यावर टीका झाली. मी पवार साहेबांच्या दबावाखाली काम करत आहे. आज उदय सामंत पवार साहेबांना भेटले. मग तुम्ही कुणाच्या दबावाखाली होतात, कसे काय मार्गदर्शन घ्यायला गेलात? असा सवाल त्यांनी केला.
बुलेट ट्रेन मेट्रोवरुन भाजपवर टीका
मविआ सरकार गेल्या गेल्या या सरकाने पहिल्यांदा बुलेट ट्रेनला जागा दिली. सोन्यासारखी जागा घशात घातली. किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार? मी आरे कारशेडला पर्यावरणासाठी स्थगिती दिली. पण केंद्र सरकार कोर्टात गेले आणि अडवून ठेवले. मी मेट्रोची कारशेड कांजूरला करणार होतो, जागेला विरोध होता, मेट्रोला नाही. आता कांजूरला पण कारशेड करणार आहे, मी हे आधीच सांगितले होते. मग ती अडवली कशाला तर मविआला श्रेय नव्हते मिळू द्यायचे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता मुंबईच्या ठेवींवर यांचा डोळा, पण त्यांचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही
मुंबईतून सगळी कार्यालये मुंबई बाहेर नेतायत. भांडवलदारी वृत्ती असल्याने सगळं ओरबडायचे. जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडेल त्याचे तुकडे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई देशात सर्वाधिक महसूल देणारे शहर आहे. ते यांना कापायचे आहे. आता मुंबईच्या ठेवींवर यांचा डोळा आहे. आता मुंबई महाराष्ट्राची लूट भांडवलदारी वृत्ती करते आहे आणि मिंधे बघताहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मला आभिमान की मविआ काळात मराठी भाषा सक्तीची या सरकारने ती या सरकारने शिथिल केली. कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार? असा उलट सवाल त्यांनी केला.
एकनाथ खडसे ज्यांनी भाजपची पाळमुळ घट्ट केली त्यांना पक्षातून घालवले. म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना पक्षाबाहेर काढलं आणि भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेतलं. भाजपची गाडी आहे, दिसला भ्रष्ट की टाक गाडीत असा हा आजचा भाजपचा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.