शनिवार, रविवार व सोमवार असे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडले. यामुळे आज भल्या पहाटेपासून मुंबई पुणे एक्सप्रेस-वे जाम झाला आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांनी दहा-दहा मिनिटांचा ब्लॉक घेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत.
मुंबई-पुणे लेनवरी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण दुसरीकडे पुणे-मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी होत आहे. तर मुंबई-पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहेत. पुढील तीन दिवस हीच परिस्थिती पहायला व अनुभवायला मिळणार आहे. भर उन्हात वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. ही वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली असल्याची भावना प्रवासी नागरिक व्यक्त करत आहेत. यावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी देखील आता होऊ लागली आहे.