• Sun. Nov 10th, 2024

    एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदाराला धक्का; २५ वर्षे सत्ता, बोदवडचा गड राखला

    एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदाराला धक्का; २५ वर्षे सत्ता, बोदवडचा गड राखला

    जळगाव : बोदवड बाजार समितीचा गड कायम राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना यश आलं आहे. बोदवड बाजार समितीवरील १८ पैकी १७ जागांवर एकनाथ खडसे यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलने विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.बोदवड बाजार समिती येथे भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यात खडसेंच्या पॅनलने आघाडी मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. दोन जागांसाठी अद्याप मतमोजणी सुरू असून अधिकृत निकाल हाती येणे बाकी आहे.

    बोदवड बाजार समितीवर गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व कायम आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही एकनाथ खडसे यांचा प्रभाव कायम असल्याचे या निकालातून दिसून आले आहे. मोठ्या फरकाने महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत धूळ चारली आहे.

    एकनाथ खडसेंना मोठा धक्का; भुसावळ बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचं एकहाती वर्चस्व
    मुक्ताईनगर, वरणगाव आणि बोदवड अशा तीन तालुक्यांमधून ही बोदवड येथील बाजार समिती आहे. या बाजार समितीवर सुरुवातीपासूनच म्हणजेच २५ वर्षांपासून एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांची या बाजार समितीवर एक हाती सत्ता होती. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादीत गेले. खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर या ठिकाणची नगरपंचायत निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विजय झाला होता.
    ठाकरेंची साथ सोडली,बाजार समिती गमावली,चिमणराव पाटलांच्या पॅनलचा धुव्वा, सतीश पाटील बनले किंगमेकर, मविआची बाजी
    बोदवड बाजार समितीवर विजय मिळवत एकनाथ खडसे यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या पंचवीस वर्षांपासूनचा हा गड कायम राखला आहे. दुसरीकडे याच निवडणुकीतून एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील यांचा बोदवड नगरपंचायत निवडणुकीतील विजयाचा एक प्रकारे बदला घेतल्याचेही बोलले जात आहे.

    बाजार समितीवरील हा विजय म्हणजे विरोधकांच्या सर्व आरोपांना उत्तर- एकनाथ खडसे

    बोदवड बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. बाजार समितीवरील हा विजय म्हणजे विरोधकांच्या सर्व आरोपांना उत्तर आहे. या सरकारच्या काळात जी दुरावस्था झाली, त्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज आहेत आणि त्यामुळे राज्यातही महाविकास आघाडीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. आगामी विधानसभेतही हेच चित्र राहील, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed