काँग्रेस अन् ठाकरेंचे शिलेदार फोडले, शिंदेंनी हवा केली पण…
विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकार शेतकरी पॅनल यांच्यात ही लढत झाली. शिंदे यांनी फोडाफोडी करून काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेतले. त्यामुळे त्यांच्या पॅनलची हवा झाली होती. प्रत्यक्षात मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कोणालाच बहुमत मिळाले नाही.
दोन्ही दिग्गज आमदार असल्याने कर्जत बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. आमदार शिंदे यांच्या पाठीशी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, भाजप नेते प्रविण घुले, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बळीराम यादव यांच्यासह नेते एकवटले होते.
सत्ता मिळविण्यासाठी फोडाफोडी होणार!
आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने पवार यांच्या पॅनलला ग्रामपंचायत मतदारसंघाने साथ दिली. दोन्ही आमदारांना कर्जतकरांनी समसमान साथ दिली. त्यामुळे आता पदाधिकारी निवडून प्रत्यक्ष सत्ता मिळविण्यासाठी पुन्हा दोघांचीही कसोटी लागणार असून फोडाफोडाची राजकारणाला आणखी वाव मिळणार आहे.
दोघांवरही समान विश्वास टाकून विषय संपविला
कर्जत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपच्या पॅनल कडून उभे राहिले होते. या राजकीय खेळीमुळे राम शिंदे यांनी रोहित पवारांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात होते. याशिवाय ठाकरे गटाते तालुकाध्यक्ष बळीराम यादव हेही शिंदे यांच्यासोबत आले होते. बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षचिन्ह नसते. असे असले तरी राजकीय दृष्ट्या नेता ज्या पक्षाचा आहे, त्याच पक्षाचे म्हणून हे पॅनल ओळखले जाते. त्यामुळे अंतिमत: शिंदे आणि पवार यांची एक परीक्षाच या रुपाने झाली.
आधीच या दोन नेत्यांमध्ये चुरस आहे. त्यातच शिंदे यांनी आपण आगामी विधानसभा आणि संधी मिळाली तर लोकसभा निवडणूकही लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणुकही तेवढीच प्रतिष्ठेची बनली होती. अखेर कर्जतकरांनी दोघांवरही समान विश्वास टाकून विषय संपविला असल्याचे दिसते.