या घटनेबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, पाडेगाव हद्दीतील वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्याच्या पुलाला धडकून मोटारसायकलवरील दोघेजण ५० फूट खोल ओढ्यात कोसळले. त्यातील मोटारसायकलवर मागे बसलेला निखिल दणाणे (रा. पाडेगाव, ता. खंडाळा) हा जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र शुभांकर बगाडे, (र. सरडे, ता.फलटण) मोटारसायकलस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी लोणंद येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली.
रात्रीच्या सुमारास लोणंदहून हे दोघेजण पाडेगावला निघाले होते. रात्रीची वेळ असल्याने रस्ता मोकळा असल्याने ते भरधाव वेगात चालले होते. नीरा उजवा कालव्याजवळ आले असता पुलाच्या कठड्याला जोरात धडक बसून अपघात झाला. ही घटना शनिवारी सकाळी प्रवाशांच्या लक्षात आली. त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यास फोन करून सांगितले. याची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले.
दरम्यान, वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करु नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. अनेक जण वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळं अनेकांना जीव गमवावा लागतो. सातारा जिल्ह्यातील सदर घटनेच्या बाबतीत देखील युवकांनी रस्ता मोकळा असल्यानं वाहतुकीच्या नियमांचं पालन न करता भरधाव वेगानं गाडी चालवल्यानं अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे तर एका जणाला रुग्णलयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.