माजी खासदार कै. दादा पाटील शेळके नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कर्डिले यांच्या गटाच्या व्यापारी मतदारसंघातील दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. त्यात सुप्रिया कोतकर, राजेंद्र बोथरा विजयी झाले होते. उरलेल्या जागांसाठी मतदान होऊन त्याही कर्डिले यांनी जिंकल्या. भाजप नेते तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले-माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने सलग चौथ्यांदा विजय मिळविला. बाजार समितीच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा महाविकास आघाडीचे नेते ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे गाडे यांचे नेतृत्व तालुक्यातील जनतेने नाकारले.
कर्डिले-कोतकर गटाला १८ पैकी १८ जागा मिळाल्या. कर्डिले, कोतकर आणि गाडे एकमेकांचे सोयरे आहेत. यात कोतकर जवळचे तर गाडे दूरून सोयरे आहेत. आणखी एक जवळचे सोयरे शहराचे आमदार संगाम जगताप आणि माजी आमदार अरुण जगताप यांनी मात्र यामध्ये उघडपणे लक्ष घातलेले दिसले नाही.
गेल्या पंधरा वर्षापासून नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत कर्डिले-कोतकर गटा विरोधात महाविकास आघाडी लढा देत आहे. तुलतेन यावेळी त्यांच्या उमेदवारांना कमी मते मिळाली. यावेळी विविध कारणांमुळे ही निवडणूक चुरशीची झाली. कर्डिले यांनी निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन तब्बल १३०० मतदारांना सहलीवर पाठविले होते. मतदानाच्या वेळी हे मतदार बसमधून आल्याने मतदान केंद्रावर मोठा वादही झाला होता.
नगर बाजार समितीच्या उभारणीमध्ये माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे सर्वाधिक योगदान आहे. त्यांची तब्बल २० वर्ष बाजार समितीवर सत्ता होती. त्यामुळे त्यांचे नाव समितीला देण्यात आले. मात्र, यावेळी त्यांचे नातू अंकूश शेळके यांचा पराभव झाला.
आम्ही कोणाला स्पर्धक समजतच नाय, रोज काम करतो, नुसती पोपटपंची नाय; दणदणीत विजयानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
अर्थात कर्डिले यांच्याकडून सत्तेचा आणि आर्थिक बळाचा वापर झाल्याचा आरोप आता विरोधकांकडून होत आहे. मात्र कर्डिले म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून आमच्याकडे एकहाती सत्ता आहे. या काळातील चांगल्या कामामुळे मतदारांनी पुन्हा सत्ता दिली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, माजी सभापती भानुदास कोतकर, युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाला आहे, असे कर्डिले म्हणाले.