• Sat. Sep 21st, 2024

कैरी काढण्यासाठी रात्रीच्या अंधारात झाडावर चढला, फांदी तुटली अन् घात झाला, विद्यार्थ्यांचा मृत्यू

कैरी काढण्यासाठी रात्रीच्या अंधारात झाडावर चढला, फांदी तुटली अन् घात झाला, विद्यार्थ्यांचा मृत्यू

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईःवरळी येथील पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या दयानंद काळे (वय २२) या विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला. बीएएमएस अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या दयानंद काळेवर पोदार रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने नायर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, जखमी दयानंदवर पोदार रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी तातडीने उपचार केले नाहीत, तसेच त्याला आवश्यक प्राथमिक सुविधाही पुरविण्यात आल्या नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग बंद करीत जोरदार आंदोलन केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सामन गावातील दयानंद काळे हा विद्यार्थी वरळी येथील पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बीएएमएस अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत होता. रुग्णालयाच्या आवारात आंबा आणि अशोकाचे झाड एकमेकांना लागून आहे. बुधवारी रात्री दयानंद आंबे काढण्यासाठी अशोकाच्या झाडावरून आंब्याच्या झाडावर जात असताना, झाडाची फांदी तुटली आणि तो खाली पडला. यावेळी डॉक्टरांनी त्याला तातडीने अपघात विभागामध्ये दाखल केले. मात्र, तेथे असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थ्यांनीच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली. पुरेशी सामग्री उपलब्ध नसल्यामुळे या शिकाऊ डॉक्टरांनाही वैद्यकीय उपचारादरम्यान अडचण येत होती. दयानंदची प्रकृती अधिक खालावत गेल्याने, त्याला तातडीने नायर रुग्णालयामध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्याने त्याला टॅक्सीमधून नायर रुग्णालयामध्ये न्यावे लागले. परंतु, नायर रुग्णालयामध्ये दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

‘… तर आमचा मित्र वाचला असता’

दयानंदला पोदार रुग्णालयामध्ये वेळेत प्राथमिक उपचार मिळाले असते, तर त्याचा जीव वाचला असता, तसेच प्रशासनाने त्याला रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग बंद करून जोरदार आंदोलन केले. यावेळी छात्रभारतीसह युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेतली. छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेत छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

सुविधा का नाही?

जखमी डॉक्टरला प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळत नसतील, तर सर्वसामान्य रुग्णांची काय अवस्था असेल? अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमध्ये हे रुग्णालय कसे चालते?, असे प्रश्न उपस्थित करीत वरळीसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागातील रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा नसणे हे संतापजनक असल्याचे मत युवासेना उपसचिव अॅड. सचिन पवार यांनी व्यक्त केले. वेळेत उपचार न मिळाल्याने त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यातील दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष रोहीत ढाले यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थीप्रतिनिधींना पोलिसांनी दिवसभर बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवले, असाही आरोप रोहीत यांनी केला.

‘डॉक्टरांकडून वेळेवर उपचार’

झाडावरून पडल्याने दयानंदच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याने त्याला अपघात विभागात आणले. त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये नायर रुग्णालयात हलवले. तसेच आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध असून, दयानंदवर उपचार करण्याबाबत कोणताही निष्काळजी केली नाही, असे पोदार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संपदा संत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed