म. टा. प्रतिनिधी, मुंबईःपश्चिम रेल्वेवरील दादर-प्रभादेवीसह वसई रोड ते नालासोपारा दरम्यान सहा वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसची वाहतूकही बंद पडली होती. यंदा या रेल्वे परिसरात पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने रुळांखाली सूक्ष्म बोगदे (मायक्रो टनेलिंग) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अतिमुसळधार पावसात साचणाऱ्या पाण्याचा वेगाने निचरा होणे शक्य होऊन रेल्वे वाहतूक अबाधित राहू शकणार आहे, असा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.वसई रोड ते नालासोपारा दरम्यान अंचोली नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने वसई यार्डात पाणी साचले होते. नालासोपारा येथील रेल्वे रूळदेखील पाण्याखाली गेले होते. या समस्येवर मात करण्यासाठी वसई ते नालासोपारा दरम्यानच्या रुळांखाली तीन सूक्ष्म बोगदे तयार केले आहेत. बोगद्यात १८०० मिमी व्यासाचे तीन पाइप टाकण्यात आले आहेत. तीव्र मुसळधार पावसात साचणाऱ्या पाण्याचा निचरा पंपाच्या मदतीने या पाइपमधून वेगाने करण्यात येणार आहे. एप्रिलअखेर बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे.
दादर-प्रभादेवी दरम्यान १२०० मिमी व्यासाचे दोन पाइप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गोरेगाव यार्ड परिसरातील दोन ठिकाणी सूक्ष्म बोगदे उभारण्यात येत आहेत. यार्ड परिसरात १८०० मिमी व्यासाचे दोन पाइप टाकण्यात येणार आहेत. जूनअखेर दोन्ही ठिकाणचे बोगदे पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पश्चिम रेल्वेवरील खार रोड, मालाड, विरार, मुंबई सेंट्रल, गोरेगाव या स्थानकांत रेल्वे रुळांखाली सूक्ष्म बोगदे तयार करण्यात आले आहेत. बोगद्यांच्या मदतीने पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा करणे शक्य झाल्याने मुसळधार पावसातदेखील रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरळीत राहणार आहे, असा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.