सुनील बेंद्रे आणि प्रियांका बेंद्रे या दोघांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते दोघेही पुण्याजवळील सूस येथे राहत होते. या दोघांनी त्यांचा भाऊ असलेला अनिल याला कामासाठी पुण्याला बोलवून घेतले होते. त्याने कामही सुरू केले होते. मात्र त्याच्या कामात नियमितता नव्हती आणि त्याच्या वर्तनामुळे त्याला तीन कंपन्यांमधून काम सोडावे लागले होते. त्यामुळे तो काही दिवसांपूर्वीच गावाला आला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याचे देखील त्यांच्या जवळच्या माणसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र सुनील आणि प्रियंका हे दोघेही आयटी क्षेत्रात असल्याने त्यांना लंडन येथे काम करण्याची संधी मिळाली होती. लंडनला नोकरी मिळाल्याने दोघेही खुश होते. आपल्या भावाचे मार्गी लावून आपण १ मे रोजी लंडनला जाऊ असा विचार दोघांचा होता.
मात्र, अनिल याने घरी वाद घालण्यास सुरुवात केली होती. दोन दिवस अगोदर त्याने वडिलांसोबत भांडण देखील केले होते. त्यानुसार वडिलांनी मोठा भाऊ सुनील याला त्याला समजावून सांगण्यासाठी बोलवून घेतले होते. त्याप्रमाणे दोघेही पतीपत्नी गावी आले होते. त्यांच्या सोबत नातेवाईकही त्याला समजावून सांगण्यासाठी आले होते. त्याला सर्वांनी समजावून सांगितले होते. पण दादा आणि वहिनी बद्दल त्याच्या मनात काय सल होती माहीत नाही. त्याने सर्वजण झोपेत असताना दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास टेरेसवर झोपलेल्या दादा आणि वहिनीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याने दादाला डंबेल्सने मारण्यास सुरुवात केली. यामध्ये वहिनीचा जागेवरच मृत्यू झाला. आणि भाऊ सुनील हा गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेनंतर गडबडीत तो घरातून गाडी घेऊन पळून जात असताना त्याचा एका चारचाकी वाहनाची धडक बसून जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बेंद्रे कुटुंब हादरून गेले. त्यात प्रियांका आणि सुनील यांचे लंडनला जाण्याचे स्वप्न देखील अपूर्ण राहिले. अनिल हा सावत्र भाऊ होता. मात्र, त्यांनी कधी त्याला सावत्र मानले नव्हते. मात्र त्याच्या मनात राहिलेल्या सलमुळे त्याने रागात हा प्रकार केल्याचे संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येते. या घटनेमुळे प्रियांका आणि सूनीलाचा संसार तर उद्धवस्त झालाच पण प्रियंकाला देखील आपले प्राण गमवावे लागले.