आगामी निवडणुकीला सामोरे जाताना मराठा चेहरा असावा, असे भाजपला वाटत असल्याने आणि अन्य समीकरणेही जुळत असल्याने विखे पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा होती. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप यायचा आहे. मात्र, तोपर्यंत अनेक राजकीय नवी समीकरणे चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे भाजपचे सहकारातील ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार… सगळीकडे ही चर्चा जोरात सुरु असताना शिंदे गटातही ही चर्चा सुरु आहे. खुद्द शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनीही विखेंच्या मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
जशी हनुमानाने छाती फाडून भगवान श्रीराम दाखवले, तशी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील. विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असे मला वाटते. कुणाला नाही वाटत आपला मित्र मोठा व्हावा. पण माझ्या मित्राला (विखेंना) अडचण होईल, असे प्रश्न त्यांना विचारु नका, मी पण अशा प्रश्नांवर उत्तरं देणार नाही, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
विखे सत्तारांची दोस्ती!
अब्दुल सत्तार हे विखे पाटील यांचे सगळ्यात जवळचे दोस्त… काँग्रेस सोडून ज्यावेळी सत्तारांना पक्ष बदलायचा होता, त्यावेळी त्यांना भाजपत जायचं होतं, पण भाजपत मोठी मेगाभरती झाल्याने ते विखेंच्या सल्ल्याने शिवसेनेत गेले. विखेंमुळेच मला मंत्रिपद मिळाल्याचे उद्गारही सत्तारांनी काढले. तसेच माझ्या जडणघडणीत विखेंचा मोठा वाटा असल्याचं देखील सत्तारांनी सांगितलं होतं. एकंदरितच सत्तारांच्या राजकीय कारकीर्दीत विखेंचं मोठं योगदान असल्याचं सत्तारांनी वारंवार सांगितलं आहे.