• Mon. Nov 25th, 2024

    स्वस्त अल्पोपाहाराची गाडी थांबली; एसटी स्थानकांतील ३० रुपयांची ‘ती’ योजना बंद

    स्वस्त अल्पोपाहाराची गाडी थांबली; एसटी स्थानकांतील ३० रुपयांची ‘ती’ योजना बंद

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई :सरकार बदलल्यानंतर सनदी अधिकारी बदलतातच; मात्र सरकार बदलल्याने चांगल्या, लोकोपयोगी योजनाही बंद होत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. ‘३० रुपयांत चहा-नाश्ता’ ही योजना एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे बंद पडली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटी बसगाड्यांना गर्दी लाभलेली असतानाच ही योजना बंद झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.एसटी महामंडळातील हॉटेल व्यावसायिकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नाममात्र दरात चहा-नाश्ता प्रवाशांना उपलब्ध व्हावा, यासाठी स्वस्त अल्पोपहार ही योजना आधीच्या युती सरकारने सुरू केली. माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर आठ जुलै २०१६ पासून राज्यातील सर्व उपहारगृहांमध्ये प्रवाशांनी याचा लाभ घेण्यास सुरूवात केली.

    करोना काळात वाहतूक बंदच असल्याने स्वस्त अल्पोपाहार योजनाही बंदच होती. करोनानंतर वाहतूक सुरळीत झाली. पुढे राज्यात सत्तांतरही झाले. उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांचे सरकार आले. ‘आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे’, असा कंठशोष या सरकारमधील धुरीण सातत्याने करीत असताना, ही जनहिताची योजना बंदच कशी असा प्रश्न केला जात आहे. या योजनेची माहिती देणारे फलक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांवरून दिसेनासे झाले आहेत.

    एसटीचे तिकीट दाखवून ३० रुपयांत चहा-नाश्त्याची मागणी केली असता ही योजना महामंडळाकडून बंद करण्यात आलेली आहे, असे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. एसटी थांबत असलेल्या हॉटेलांवर बाटलीबंद पाणी २० रुपये, चहा २० रुपये, इडली ६० रुपये असे दर आहेत. यामुळे महामंडळाने ही योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी गिरीश हरड यांनी केली आहे.

    एसटी स्थानकांतील वाणिज्य आस्थापना

    उपाहारगृह – १४०
    स्नॅकबार – १२६
    टी स्टॉल – ४४३
    अन्य – २,३१९

    एकूण आस्थापना – ३,६५६
    कार्यरत आस्थापना – २,७६४
    रिक्त आस्थापना – ८९२
    स्रोत – एसटी महामंडळ, विधिमंडळ अधिवेशन अहवाल
    कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेपर्यंत परशुराम घाट बंद, १००हून अधिक ST फेऱ्या रद्द
    रिक्त आस्थापनांचे काय ?

    महामंडळाच्या नियोजन व पणन खात्यांतर्गत प्रवासी सुखसोयी व सुविधेनुसार हॉटेल थांबे, उपाहारगृह, स्नॅकबार यांचे नियोजन केले जाते. राज्यातील ३,६५६ पैकी ८९२ आस्थापना रिक्त आहेत. यामुळे एसटी गाड्या खासगी आस्थापनांवर थांबवल्या जात असल्याने रिक्त आस्थापनांबाबत निर्णय कोण घेणार, असा प्रश्न आहे.

    -करोना, सत्तांतरानंतर योजनेला मिळेना गती
    – जनाधाराच्या योजनेकडे महामंडळाचा कानाडोळा
    -योजना पुन्हा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

    ३० रुपयांत काय मिळायचे?
    – यांपैकी एक – शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, मेदूवडा
    – एक चहा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed