• Sun. Sep 22nd, 2024
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी निघालेली पोलिसांची गाडी उलटली, १७ जण जखमी

राजापूर:कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगावर रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारी जमिनीचे सर्वेक्षण होणार होते. या सर्वेक्षणासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा राजापूरच्या कशेळी बांध येथे अपघात झाला. याठिकाणी पोलीस व्हॅन पलटी होऊन १७ जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पोलिसांच्या प्रकृतीबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही. आज सकाळपासून बारसू येथील रिफायरी सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या बंदोबस्तासाठीच रत्नागिरी मुख्यालयातून दोन पोलीस पिंजरा गाड्या जात होत्या. रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने पोलिसांची गाडी खाली गेली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या सगळ्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली आहे. काही पोलीस कर्मचारी जिल्हा रुग्णालयात मदतीसाठी थांबवण्यात आले आहेत.

कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या प्रस्तावित भू सर्वेक्षणला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मीडियाव्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देऊन योजना आखत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने रिफायनरी विरोधी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले असून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामूळे सर्व मीडिया प्रतिनिधीनाही प्रस्तावित सर्वेक्षणाचे ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या परवानगी शिवाय त्या परिसरात जाऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त या परीसरात तैनात करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित भू सर्वेक्षण ला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मीडिया व्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देऊन दखलपात्र गुन्ह्याचे योजना आखत असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने 1) सत्यजित चव्हाण आणि त्याला मदत करणारा 2) मंगेश चव्हाण या दोघांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 153(1) प्रमाणे ताब्यात घेऊन ते दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कलम 151(3) प्रमाणे मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश केले आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed