आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी मला दिली, ती मी पार पाडली आहे. आधी लोकप्रतिनिधी म्हणून आणि नंतर पक्ष संघटनेतून जनतेचे कामं केली आहेत. आता पक्षाने काही जबाबदारी दिली, तर ती देखील मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत आहे. हे खरं आहे. पक्षाने संधी दिली तर मी निश्चितच पुणे लोकसभा लढवण्यासाठी तयार आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश पाळला आणि आताही पक्षाने लढण्याचे सांगितले, तर तो आदेश मानून नक्कीच पोटनिवडणूक लढवेन, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
दुसरीकडे भाजपातून मुळीक, मोहोळ, माजी खासदार संजय काकडे यांचीही लोकसभा लढवण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. आता या स्पर्धेत मेधा कुलकर्णीही उतरल्याने पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळू शकते. त्यामुळे आता पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल? कोणाला उमेदवारी द्यावी? हा पेच भाजप श्रेष्ठींपुढे निर्माण झाला आहे.
दरम्यान, कसब्यातील पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना डावलण्यात आल्याने ब्राह्मण समाजाचा रोषाचा सामना पक्षाला करावा लागला होता. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हक्काचा मतदारसंघ सोडावा लागल्याची खंत मेधा कुलकर्णी यांच्या मनात आहेच. त्यामुळे कुलकर्णी यांना संधी देऊन भाजपला ही दुहेरी नाराजी दूर करण्याची संधी असल्याचं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ ब्राह्मण उमेदवाराकडे नसल्याने ब्राह्मण समाजाची भाजपवर नाराज आहे. यामुळे एकाच वेळी ब्राह्मण समाज अन् मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यासाठी कुलकर्णी यांची पुणे लोकसभेची लॉटरी लागू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत.