म. टा. प्रतिनिधी, पुणे :पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमधील ‘डी ११’ क्रमांकाच्या डब्यामध्ये जागेवरून पुरुष आणि महिला प्रवाशांमध्ये सोमवारी सकाळी वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान, सिंहगड एक्स्प्रेसचे डबे १९ वरून १६पर्यंत कमी केल्यामुळे जागेसाठी सतत वाद होत आहेत.सिंहगड एक्स्प्रेस सोमवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे स्टेशनवरून सुटली. या गाडीला सध्या ‘एलएचबी’चे १६ डबे आहेत. या गाडीमध्ये शिवाजीनगर येथून प्रवास करणाऱ्यांसाठी ‘डी १०’ आणि ‘डी ११’ हे दोन डबे आणि महिला प्रवाशांसाठी ‘डी १२’ हा डबा राखीव आहे. या गाडीला सोमवारी प्रवाशांची गर्दी जास्त असते. शिवाजीनगरचे प्रवासी पुढच्या स्थानकावर चढणाऱ्या प्रवाशांसाठी अनेकदा जागा पकडतात. महिलांच्या डब्यातही जास्त गर्दी झाल्याने काही महिला प्रवासी ‘डी ११’मध्ये आल्या. त्यांनी जागेच्या कारणावरून पुरुष प्रवाशांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र, हा डबा अनारक्षित असल्याने पुरुष प्रवाशाने सीट वरून उठण्यास नकार दिला. त्यामुळे वाद वाढला. शेवटी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना हस्तक्षेप करावा लागला.
डबे कमी झाल्यामुळे वाद
डबे कमी झाल्यामुळे वाद
सिंहगड एक्स्प्रेस सध्या १६ डब्यांसह धावते. पूर्वी ही गाडी १९ डब्यांसह धावत होती. मात्र, ‘सीएसएमटी’ स्थानकावरील फलाट क्रमांक नऊची लांबी कमी असल्याने सिंहगड एक्स्प्रेसला डबे वाढविता येत नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. डब्यांची संख्या कमी झाल्यामुळे सतत जागेवरून वाद होत आहेत. त्यामुळे या गाडीला किमान दोन डबे वाढवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सिंहगड एक्स्प्रेस सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुण्यातून मुंबईसाठी रवाना होते. मुंबईला जाणाऱ्यांची गाडीत संख्या मोठी असते. सध्या गाडीला ‘एलएचबी’चे १६ डबे आहेत, त्यांची संख्या २४ करण्याची गरज आहे. त्याबरोबरच प्रगती, डेक्कन क्वीन या गाड्यांच्याही डब्यांची संख्या २४वर नेण्याची गरज आहे.- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ