• Mon. Aug 3rd, 2026

    इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ४ ऑगस्टपासून विशेष फेरी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 3, 2026
    इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ४ ऑगस्टपासून विशेष फेरी – महासंवाद

    मुंबई, दि. ३ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सुमारे १२.९८ लाख विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप काही विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्याने त्यांच्यासाठी ४ ऑगस्ट २०२६ पासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

    विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करणे आवश्यक राहणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रम आणि गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप करण्यात येणार आहे. या विशेष फेरीसाठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच भाग-१ मधील आवश्यक दुरुस्ती करण्याची सुविधा ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. याच कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरून अर्ज अंतिम स्वरूपात लॉक करता येणार आहे.

    विशेष फेरीतील प्रवेश वाटप प्रक्रिया ७ ऑगस्ट रोजी पार पडणार असून ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्रवेश वाटपाची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येणार आहे. प्रवेश वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येईल. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

    दरम्यान, इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज मागे घेण्याचे आवाहनही शिक्षण संचालनालयाने केले आहे. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ mahafyjcadmissions.in तसेच हेल्पलाईन क्रमांक ८५३०९५५५६४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    0000

    बी.सी.झंवर/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed