सोलापूर: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित सोहळ्यात उष्माघातामुळे १३ श्री सदस्यांचे बळी गेले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावच्या रहिवासी सविता संजय पवार यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. लेकीचा मृतदेह पाहून सविता यांच्या मातोश्रींनी आक्रोश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.श्री सदस्या सविता संजय पवार या सोलापूरहून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी नवी मुंबईला आल्या होत्या. यावेळी त्यांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. सविता यांचे पार्थिव मंगळवेढा येथील मूळ गावी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळजाला घरं पाडणारा होता. लेकीचा मृतदेह पाहून त्यांच्या आईने एकच हंबरडा फोडला. हे दृश्य सर्वांचंच मन हेलावणारं होतं.
दोस्ताच्या लग्नाला जाताना काळाचा घाला, कारची बाईकला धडक, दोघा मित्रांसह तिघांचा मृत्यू
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित होताना याचि देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांनी हजेरी लावल्याचे बोलले जाते.दरम्यान, या दुर्घटनेविषयी महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यातर्फे पत्रक जारी करत खेद मांडण्यात आला आहे. ‘या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे.’ अशा भावना आप्पासाहेबांनी व्यक्त केल्या आहेत.
जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही