• Tue. Nov 26th, 2024

    ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Apr 17, 2023
    ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. १७ : घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. राज्य शासनसुद्धा नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने ‘नमो आवास’ घरकुल योजना सुरू केली आहे. या अंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यात १० लक्ष घरे निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारे आयोजित सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. प्रियदर्शनी सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त बिपीन पालिवाल, संध्या गुरनुले, अति. मुख्य कार्यपालन अधिकारी सुभाष पवार, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, कृषी अधिकारी श्री. बराटे, आत्माच्या प्रमुख प्रीती हराळकर, समाज कल्याण सहा.आयुक्त अमोल यावलीकर,  श्री.वाकुलकर, सुरेश पेंदाम आदी उपस्थित होते.

    समाजातील विविध घटकांना न्याय देणे, त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणे व त्यांच्यापर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविणे ही आजच्या दिनी केलेली संकल्पपूर्ती होय, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, या परिसरातील कुणीही बेघर राहता कामा नये. सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत विशेष बाब म्हणून २८०३ घरे मंजूर करण्यात आली आहे. महाप्रित अंतर्गत म्हाडामध्ये १० हजार घरे बांधण्यात येणार आहे. याबाबत नुकताच चंद्रपूर मनपा आणि महाप्रित यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ एक दिवस साजरी करून चालणार नाही. तर पुढील ३६५ दिवस चांगले कार्य करण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधानाची अमूल्य भेट दिली आहे. यात केवळ अधिकारच नाही तर मुलभूत कर्तव्ये आणि आपली जबाबदारीही नमूद आहे. आपण केवळ अधिकारांसाठीच लढत असून कर्तव्याला मात्र सोयीस्कररित्या विसरतो. डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी त्यांच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे.

    पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, समाजात आजही रोज संकटाचा सामना करणारा, हातावर पोट असणारा वर्ग मोठा आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहचत नाही. योजना पोहचविण्यात आपण कमी पडतो. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे वाघाच्या गतीनेच शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. महाराष्ट्राचे वर्णनच ‘चांदा ते बांदा’ असे होते. त्यामुळे चांदा हा प्रत्येक गोष्टीमध्ये राज्यात अग्रेसर असला पाहिजे.

    वनमंत्री म्हणून तेंदूपत्त्याच्या बोनसमध्ये आपण चारपटीने वाढ केली आहे. मजुरांच्या कुटुंबाना आता ७२ कोटी रुपये बोनस देण्यात येणार आहे. १९७१ मध्ये कुटुंबाकडे सरासरी जमीन ४.२८ हेक्टर होती. आता ती १.३४ हेक्टरपर्यंत खाली आली आहे. त्यासाठीच राज्य सरकार शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. यात चंद्रपूर जिल्हा मॉडेल ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वत: योगदान दिल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. शासकीय योजनेच्या लाभातून आपण काहीतरी योगदान देऊ शकतो, याचा विचार करावा.

    संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुरवातीला ६०० रुपये देण्यात येत होते. ते नंतर १२०० रुपये तर आता १५०० रुपये करण्यात आले आहे. शेतकरी सन्मान योजनेत आता ६ हजार रुपयांवरून १२ हजार रुपये देण्यात येतील. याचा लाभ राज्यातील १ कोटी १५ लक्ष शेतकऱ्यांना होणार आहे. अंगणवाडी सेविका, आशाताई, कोतवाल, शिक्षणसेवक आदींना सरकार मदत करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या यशोगाथा पुस्तिकेचे तसेच विभागाच्या योजनांची माहिती असलेल्या पॉकेट डायरीचे प्रकाशन करण्यात आले.

    पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनेंतर्गत लाभार्थींना धनादेश / प्रमाणपत्र / साहित्य वाटप :

    सामाजिक न्याय पर्वानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनेंतर्गत लाभार्थींना धनादेश / प्रमाणपत्र / साहित्य वाटप करण्यात आले. यात अतिवृष्टीमुळे अंशत: घराचे नुकसान झालेल्या आबाजी भोयर, दिवाकर धांडे यांना तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्चना रायपुरे यांना धनादेश देण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत प्रदीप गदेकार, पांडूरंग मंढरे, राकेश मांडवगडे यांना धनादेश, महाज्योती जेईई / नीट पूर्व प्रशिक्षण टॅब वाटप अंतर्गत श्रद्वा मल्लेलवार, गौरव भागडे यांना टॅब वितरण करण्यात आले. मिनी ट्रॅक्टर योजनेंतर्गत दीपस्तंभ युवा बचत गट, संकल्प पुरुष बचत गट यांना धनादेश, तुषार राहुलगडे आणि वैष्णवी तुराणकर यांना जातवैधता प्रमाणपत्र, सचिंद्र उईके यांना दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य, सुभाष मानकर यांना रमाई आवास योजना, कविता उईके यांना प्रधानमंत्री आवास योजना, गोरगबाबा आत्राम यांना शबरी आवास योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र, माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मेधस्वी कोठारे यांना प्रमाणपत्र अशा विविध योजनांच्या एकूण ३१ लाभार्थींना धनादेश / प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

    प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी प्रास्ताविक केले. सचिन फुलझेले यांनी संचालन केले तर पुनम आसेगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संबंधित विभागाचे अधिकारी, लाभार्थी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed