वीर याने आंबेडकर जयंती निमित्त केलेलं हे ढोल वादन अखेरचं ठरलं आहे. वीर याला ढोल वाजवण्याचा छंद होता. त्यामुळे तो या पथकासोबत ढोल वाजवण्याचे काम करायचा. वीरच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोरेगावमधील बाजीप्रभू ढोल-ताशा पथकावर हे दुःख कोसळलं आहे. आंबेडकर जयंती निमित्ताने मुंबई येथील गोरेगाव येथील ढोल ताशा पथक पुण्यात आले होते. मात्र, पुन्हा घरी परतताना खोपोलीजवळ बस दरीत कोसळली आणि १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. बस चालकाचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली.
बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांनी केलेल्या वादनाचे व्हिडीओ व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गेल्या वर्षीच हे पथकाची सुरुवात करण्यात आली होती, अशी माहिती देखील समोर येत आहे.
पहाटेच्या वेळी साखर झोपेत असताना हा अपघात घडल्याने अनेकांची पुन्हा सकाळ झालीच नाही. पिंपरी चिंचवड येथील सुदर्शन नगर येथील मंडळाने हळहळ व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अगदी कोवळ्या वीरवर काळानं घाला घातल्यानं त्याचे कुटुंब दुःखात बुडाले आहे. ध्यानी मनी नसताना अशी दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.