• Mon. Nov 25th, 2024
    दरीतून बाहेर काढल्यानंतर लहान मुलांनी पाणी मागितलं, पण ॲम्ब्युलन्समध्ये पाणी दिलं नाही कारण…

    पुणे:जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मार्गावरील बोरघाटानजीक शिंगरोबा मंदिराजवळच्या दरीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी बस कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रेलिंग तोडून तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळली. बोरघाटातील गावकऱ्यांना प्रवाशांच्या किंकाळ्यांचे आवाज ऐकू आल्यानंतर ते घटनास्थळी आले आणि त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. या मदतकार्यात स्थानिक ट्रेकर्स आणि हायकर्स ग्रुप सहभागी झाले. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला, तेव्हापासून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

    मुंबईचं झांजपथक पथक साखरझोपेत असताना घात झाला, खिंडीसारख्या भागातून बस पुढे निघाली अन् १५० फूट खोल दरीत कोसळली

    हायकर्स ग्रुपमधील तरुण पहाटेच्या अंधारात दोरखंड लावून खाली दरीत उतरले. बसच्या जवळ गेल्यानंतर अनेकजण जखमी अवस्थेत पडले होते. जोरात आदळल्यामुळे बसचा चक्काचूर झाला होता, बसचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले होते. जबर मार लागलेले प्रवाशी विव्हळत होते. प्रत्येकजण सुटकेसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होता. हायकर्स ग्रुपमधील तरुणांनी सर्वप्रथम महिला आणि मुलांना वर नेण्यास सुरुवात केली. या अपघातामधून सुदैवाने बचावलेल्या काही लहान मुलांना सकाळी दरीतून वर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेत बसले असतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    मुंबईतील ढोलताशा पथक झोपेत असताना बस १५० फूट खोल कोसळली, बोरघाटातील दरीतून थरकाप उडवणारा किंकाळ्यांचा आवाज

    या व्हिडिओत तीन लहान मुलं रुग्णवाहिकेत बसलेली दिसत आहेत. रुग्णवाहिकेत शिरताच यापैकी एका मुलाने, ‘काका पाणी द्या ना’, असे म्हटले. त्यापाठोपाठ दुसरा मुलगाही, ‘पाणी प्यायचंय’, असे म्हणाला. या लहान मुलांच्या घशाला कोरड पडल्यामुळे ते सतत पाणी प्यायला मागत होते. मात्र, रुग्णवाहिकेतील लोकांनी त्यांना पाणी दिले नाही. अपघात झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला लगेच पाणी देऊ नये, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. त्यामुळे रुग्णावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. याच सल्ल्याचे पालन करत रुग्णवाहिकेतील लोकांनी या लहान मुलांना पाणी दिले नाही. ‘पाणी नगा, हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत पाणी पिऊ नका. तिकडे गेल्यावर सगळं भेटेल, फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर हॉस्पिटल आहे’, असे सांगून लोकांनी लहान मुलांची समजूत काढली.

    मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

    जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed