या बाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी वैशाली कवडे पाऊस आल्याने घराच्या अंगणात लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या. त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने वैशाली यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन पोरं मायेला मुकले
दरम्यान, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून घटनेची माहिती वावी पोलिसांना देऊन या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. वैशाली कवडे यांच्या दुर्दैवी मृत्युने कवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पती आणि सासू असा परिवार आहे. वाळत घातलेले कपडे घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा वीज पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान अन् बत्तीही गुल, शेतकरी पुन्हा अडचणीत
आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला जात आहे. अनेक ठिकाणी पोल्ट्री शेडपडून पक्षांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी नागरिकांचे राहते घर उध्वस्त झाले आहे. अशातच दुर्दैवी बाब म्हणजे पावसामुळे जीवितहानी देखील झाली आहे.