• Sun. Sep 22nd, 2024
लाचखोर पीएसआयचा सिनेस्टाईल पाठलाग; पळता पळता लाचेची रक्कम फेकली; कारमध्ये सापडलं घबाड

जालना: लाचलुचपत विभागाच्या सापळ्याचा संशय येताच धूम ठोकणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पळून जाताना लाचेची रक्कम फौजदाराने अक्षरशः फेकून दिल्याचे समोर आले. त्याचवेळी त्याच्या कारमधील ९ लाख ४१ हजार ५९० रुपयांची रोकड, तब्बल २५ तोळे सोने असे मोठे घबाड पथकाच्या हाती लागले. ही कारवाई काल बुधवारी जालना शहरात करण्यात आली.गणेश शेषराव शिंदे असे लाच स्वीकारणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जालना शहरातील कदीम पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदाराला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणात तक्रारदारावर ११० ऐवजी १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार गणेश शिंदे याने १ लाख रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने काल बुधवारी जालना येथील कदीम पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा लावला.

पोलीस उपनिरीक्षक शिंदे याने लाचेची मागणी करून ७५ हजार रुपये स्वीकारले खरे, पण एसीबीच्या सापळ्याचा संशय आल्याने लाचेच्या रकमेसह शिंदे याने कारमधून पळ काढला. पथकाने जवळपास तीन किलोमीटर पाठलाग करून शिंदे याला ताब्यात घेतले. त्यावेळी स्वीकारलेली रक्कम त्याने वाटेत फेकून दिल्याचे समोर आले. त्याला पकडल्यानंतर पंचांसमक्ष पथकाने त्याच्या कारची तपासणी केली आणि पथक देखील आवाक झाले.

कारच्या तपासणीत ९ लाख ४१ हजार ५९० रुपयांची रोकड व तब्बल २५ तोळे सोने सापडले. संबंधित मुद्देमाल लाचलुचपत पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.दरम्यान या पोलिस उपनिरीक्षकाला लाच मागणं चांगलंच अंगाशी आलं. शिवाय गाडीतील ९ लाखांसह २५ तोळे सोने गमावल्याची चर्चा कदीम जालना पोलिस ठाण्याच्या आवारात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed