• Sun. Sep 22nd, 2024
मास्कसक्ती करणं सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगलट, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं, सचिवांनी सुनावलं

सातारा: मास्क सक्तीमुळे सरकारी कार्यालयांत प्रवेश मिळण्यास अडचण होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकरवी जिल्हाधिकारी जयवंशी कानउघाडणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मास्क सक्ती तत्काळ मागे घ्यावी लागली. त्यामुळे मागील आठवड्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सातारा जिल्ह्यात लागू केलेली मास्कसक्ती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अंगलट आली आहे.देशभरात साथ नियंत्रण कायदा लागू आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना काही अधिकार दिले जातात. याच नियमाचा वापर करत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मास्क सक्तीचे आदेश आपल्या स्तरावर जाहीर केले. या आदेशांमुळे नागरिकांची मोठी अडचण झाली. मास्क न घालता गेल्यास सरकारी कार्यालयात त्यांना प्रवेश मिळेनासा झाला. त्यात खुद्द मुख्यमंत्रीच सातारा जिल्ह्याचे असल्याने ही तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली.

त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अशी परस्पर मास्क सक्ती कशी जाहीर केली, अशी विचारणा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे केली. त्यानंतर सूत्रे हलली आणि मुख्य सचिवांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच संपर्क केला. अशा प्रकारे मास्क सक्ती करता येणार नाही, त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतरच तुम्हाला घेता येतो, असेजिल्हाधिकाऱ्यांना बजावण्यात आले. यामुळे जवळपास आठ ते नऊ दिवस साताऱ्यात लागू असलेली मास्क सक्ती अखेर मागे घेण्यात आली.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मास्क सक्तीचे कोणतेही आदेश दिले नव्हते. खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन केले होते, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले आहे.

राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सरकारी कार्यालयांत मास्कसक्तीचा निर्णय घेतला होता. काही लोकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर नाकं मुरडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed