• Mon. Nov 25th, 2024

    मुलांना शाळेत सोडलं, घरी येऊन पत्नीचा काटा काढला, पोलिसांनी ४ दिवसात बेड्या ठोकल्या

    मुलांना शाळेत सोडलं, घरी येऊन पत्नीचा काटा काढला, पोलिसांनी ४ दिवसात बेड्या ठोकल्या

    नवी मुंबई :पनवेलमधील कामोठे भागात ४ दिवसांपूर्वी एक हादरवणारी घटना घडली होती. निर्दयी पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली होती. विवाहित महिलेच्या डोक्यात जड वस्तूने आघात करून ही हत्या करण्यात आली होती. दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रूम नंबर ४०१, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, सेक्टर ११, कामोठे येथे एका महिलेला अत्यंत निर्घृण पद्धतीने जीवे मारल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि प्रशासन कामाला लागले.पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर महिलेचा पती संशयाच्या भोवऱ्यात सापडला. मृत महिलेचा पती बिराप्पा श्रीरंग शेजाळ (वय वर्ष ४१) हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता. पोलिसांना मोबाईल, वापरलेले हत्यार देखील मिळत नव्हते. पोलीस पथकाने अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक तपासच्या आधारे मृत महिलेचा पती बिराप्पा शेजाळ हा आदमापुर – कोल्हापूर येथे लपून बसला असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हेशाखा, कक्ष-2 च्या पथकाने बिराप्पा शेजाळ याला पळून जाण्याचा प्रयत्नात असताना शिताफीने कोल्हापूरमधून ताब्यात घेतले.

    पत्नीच्या हत्येबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले. पत्नीशी वारंवार होणाऱ्या घरगुती वादातून रागाच्या भरात डोक्यात हातोडी मारून तिचा निर्घृणपणे खून केल्याची कबुली बिराप्पा शेजाळने दिली. आरोपी बिराप्पा शेजाळ हा आपल्या पत्नीसोबत वारंवार भांडण करत होता. घरखर्चासाठी तिला पैसेदेखील देत नव्हता.

    आपल्या पत्नीच्या हत्येच्या दिवशी बिराप्पा शेजाळ मुलांना शाळेत सोडून आला. मात्र शाळा सुटल्यानंतर मुलांना नेण्यास कोणीही आले नसल्याने मृत महिलेच्या भावाने घरी जाऊन पाहिले असता दरवाजा बंद होता. भावाला संशय आल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला.

    आतमध्ये आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून त्याला जबर धक्का बसला. त्याने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या गंभीर प्रकरणाचा शीघ्र गतीने तपास करत पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणातील निर्दयी आरोपी बिराप्पा शेजाळ याच्या नवीमुंबई गुन्हेशाखा, कक्ष-२ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed