• Sun. Sep 22nd, 2024

जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करा- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

ByMH LIVE NEWS

Apr 13, 2023
जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करा- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक 13 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा) जलजीवन मिशनच्या माध्यामातून गावे, घरांसाठी शाश्वत स्वरूपाची पाणी योजना निर्माण होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एकही पाडा, गाव, घर वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना आज पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील जलजीवन मिशन आणि घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते.  या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत उगले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

काटेकोर सर्वेक्षण करण्यात यावे 

यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले, जलजीवन मिशन आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहता कामा नये. तसेच लोकांच्या तक्रारी कमी होण्यासाठी 15 दिवसांच्या आत ग्रामसभेतून सर्वेक्षणाचे पुनर्विलोकन करून सर्वेक्षण अधिक काटेकोर करून घ्यावे. यात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करावी.  धडगाव, अक्कलकुवा, शहादा या तालुक्यातून त्रुटींबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा करून सर्वसमावेशक गावांचा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात यावा.

100 टक्के घरांचा समावेश करावा 

जलजीवन मिशनच्या माध्यमातून गाव, पाडा, मनुष्यनिहाय नियोजन करण्याची ही आगळी-वेगळी योजना असून येणाऱ्या 30 वर्षांसाठी पेयजलाची ही शाश्वत स्वरूपाची योजना आहे. त्यामुळे गावातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे. त्यामुळे लोकांना वेळेत पेयजल मिळण्यासाठी वेळेत योजना पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या आहेत.

दोन हजार 593 योजनांना मंजुरी त्यातील 733 चे काम सुरू 

जिल्ह्यात जलजीवन मिशन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या 2593 योजनांना मंजूरी घेण्यात आली असून त्यातील 733 योजनांच्या काम सुरू करण्यात आले आहे. त्यात अक्राणी तालुक्यात 963 योजनांना मंजूरी देण्यात आली आहे त्यातील 176 योजनांचे काम सुरू झाले आहे. अक्कलकुवा तालुक्यात 931 योजना मंजूर असून त्यातील 206 कामे सुरू झाले आहे. नंदुरबार तालुक्यात 89 योजना मंजूर असून त्यातील 59 योजनांची कामे सुरू झाली आहेत. नवापूर तालुक्यात 314 योजनांना मंजूरी देण्यात आली असून त्यातील 101 योजनांची कामे सुरू झाली आहेत. शहादा तालुक्यात 179 योजनांना मंजूरी देण्यात आली असून त्यातील 145 योजनांची कामे सुरू झाली आहेत. तळोदा तालुक्यात 117 योजनांना मंजूरी देण्यात आली असून त्यातील 46 योजनांची कामे सुरू झाल्या आहेत.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed