• Sun. Sep 22nd, 2024
मुंबईतील पॅथॉलॉजी लॅबची घोडचूक, HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली

मुंबई:आपण आजारी पडल्यास अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध वैद्यकीय चाचण्या करवून घेत असतो. पूर्वी रक्ताची किंवा इतर वैद्यकीय चाचण्या करायच्या म्हटल्या की, मोजक्या पॅथॉलॉजी लॅब्समध्ये जावे लागायचे. परंतु, अलीकडच्या काळात अगदी घरी येऊन रक्ताचे नमुने गोळा केले जातात, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रिपोर्टस पाठवले जातात. अशाप्रकारच्या सेवा देणारी अनेक डायग्नोस्टिक सेंटर्स मुंबईत कार्यरत आहेत. मात्र, अशाच एका पॅथॉलॉजी लॅबच्या घोडचुकीमुळे मुंबईतील एका सामान्य माणसाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईत सेल्स एक्झ्युकिटिव्ह म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीबाबत हा प्रकार घडला आहे. या व्यक्तीच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याने SRL diagnostics या मुंबईतील पॅथॉलॉजी लॅबमध्ये काही चाचण्या केल्या होत्या. १ मार्च रोजी SRL diagnostics च्या कर्मचाऱ्याने या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या रक्ताचे नमुने घेतले होते. दुसऱ्या दिवशी आणखी एक कर्मचारी दुसऱ्या सेटमधील रक्ताचे नमुने घरी घेण्यासाठी आला होता. दोन दिवसांनी संबंधित व्यक्तीला त्याच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल ईमेलद्वारे पाठवण्यात आला. हा अहवाल पाहून या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण SRL diagnostics च्या अहवालात संबंधित व्यक्ती HIV positive असल्याचे नमूद करण्यात आले होते. HIV Test च्या रकान्यात ‘Reactive’ असा शेरा लिहण्यात आला होता. साहजिकच हा रिपोर्ट पाहून संबंधित व्यक्ती चांगलाच हादरला.

या व्यक्तीवर त्याच्या कुटंबाची जबाबदारी होती. दीड वर्षांपूर्वी या व्यक्तीच्या पत्नीची दृष्टी गेली होती. त्याला दोन लहान मुली आहेत. आपल्याला एड्स झाल्यामुळे आता या सगळ्यांचे काय होणार, असा प्रश्न या व्यक्तीला पडला होता. एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यापासून हा माणूस प्रचंड मानसिक तणावात होता.हे प्रकरण इतके टोकाला गेले होते की, या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले होते. मात्र, थोड्याच दिवसांत SRL diagnostics चा रिपोर्ट चुकीचा असून आपण HIV पॉझिटिव्ह नसल्याचे या व्यक्तीला समजले आणि त्याचा जीव भांड्यात पडला.

वयाच्या १४-१५ वर्षीच HIV टेस्ट केली, खूप घाबरलो होतो; शिखर धवननं सांगितला ‘मनाली’चा किस्सा

मानसोपचार तज्ज्ञांकडे गेला आणि रिपोर्टमधील घोळ समोर आला

कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर त्याला ती गोष्ट थेट सांगितली जात नाही. HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचे डॉक्टरांकडून समुपदेशन केले जाते. ही गोष्ट त्याला थेट न सांगता ज्या डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात त्याचे उपचार सुरु आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना या सगळ्याची कल्पना दिली जाते. परंतु, SRL diagnostics ने हे सर्व नियम धाब्यावर बसवत थेट या व्यक्तीला रिपोर्ट पाठवून दिले.

SRL diagnostics च्या रिपोर्टमध्ये आपण HIV पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यामुळे हा व्यक्ती मानसिक विवंचनेत होता. मनात आत्महत्येचे विचार येत असल्याने हा व्यक्ती क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असणाऱ्या वैशाली शेलार यांच्याकडे गेला. वैशाली शेलार यांनी म्हटले की, हा व्यक्ती जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा तो प्रचंड धक्क्यात होता. तो आत्महत्या करण्याची भाषा करत होता. मानसोपचार तज्ज्ञ आत्महत्या हा शब्द नेहमीच गांभीर्याने घेतात. मी त्याला शांत केले आणि त्याचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर वैशाली शेलार यांनी या व्यक्तीला रक्ताच्या चाचण्या पुन्हा करायला सांगितल्या. त्यानुसार या व्यक्तीने बॉम्बे रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या केल्या. तेव्हा त्याचा एचआयव्ही रिपोर्ट नेगेटिव्ह आला. दुसऱ्या एका लॅबमध्ये केलेल्या डीएनए क्वालिटेटिव्ह टेस्टमध्ये या व्यक्तीला एड्स झाला नसल्याचे स्पष्ट झाले. आता या सगळ्याची पक्की खात्री करण्यासाठी या व्यक्तीने एडस् उपचारांसाठी असणाऱ्या शासकीय केंद्रात चाचणी करण्याचे ठरवले आहे. कारण यापूर्वीच्या सगळ्या चाचण्या वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या होत्या. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या चाचण्यांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

नवरा-बायको दोघेही HIV पॉझिटिव्ह, रक्तगटही वेगवेगळे, तरीही बीडच्या विवाहितेचं पतीला जीवनदान

एसआरएल डायग्नोस्टिक्स दाव्यावर ठाम

या सगळ्या प्रकारानंतर SRL diagnostics आपल्या रिपोर्टवर ठाम आहे. परंतु, आम्ही या घटनेनंतर कायदेशीर निकषांचे पालन करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. एखादे निदान झाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी रक्ताचे नमुने पुन्हा गोळा करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी चुकून त्या व्यक्तीला ईमेल पाठवला गेला. ग्राहकांच्या सूचना आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. यामुळे आमची प्रक्रिया अधिक निर्दोष होईल. आम्ही संबंधित व्यक्तीला एडस् झाल्याच्या अहवालाची प्रत समुपदेशनानंतरच दिली होती. मात्र, संबंधित व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, या दाव्यावर आम्ही ठाम आहोत. आम्हाला आमच्या चाचण्यांच्या अचूकतेवर विश्वास आहे, असे SRL diagnostics कडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed