पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथ्थू सिंगने सदिच्छाला मारल्याची कबुली दिली आहे. खून केल्यानंतर आपण सदिच्छाचा मृतदेह समुद्रात टाकून दिल्याचेही मिथ्थूने सांगितले. त्याने पोलिसांना सदिच्छाचा मृतदेह समुद्रात नेमका कुठे टाकला, ती जागाही दाखवली होती. मात्र, अद्याप सदिच्छा सानेचा मृतदेह मिळालेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
सदिच्छा साने ही २९ नोव्हेंबर २०२१ पासून गायब आहे. सदिच्छा साने त्यादिवशी सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी विरार रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली आणि अंधेरीला उतरली, कारण तिला जेजे हॉस्पिटलमध्ये दुपारी दोन वाजता प्रिलिमसाठी हजर व्हायचे होते. तिथून ती दुसर्या ट्रेनमध्ये चढली आणि वांद्रे येथे उतरली तिथून तिने रिक्षाने बँडस्टँड गाठलं. बेपत्ता होण्यापूर्वी तिने संपूर्ण दिवस त्याच भागात घालवल्याचा अंदाज आहे.
सदिच्छाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बोईसर आणि नंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. नव्या वर्षात हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. अनेक दिवसांच्या तपासानंतर गुन्हे शाखेने मिथ्थू सिंग आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी याच्याविरोधात १७९० पानांचे आरोपपत्र सादर केले होते. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करताना जवळपास १०० जणांचे जबाब नोंदवले होते. यामध्ये मिथ्थू सिंगच्या चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यापैकी एकाने पोलिसांना सांगितले की, मी जब्बार अन्सारी याला मिथ्थूशी चारवेळा फोनवर बोलताना ऐकले. तेव्हा जब्बार मिथ्थूला, ‘तू तिच्यासोबत सेक्स केलास का?’, ‘तुला बेडशीट मिळाली का?’, असे प्रश्न विचारत होता. आणखी एका कर्मचाऱ्याने मिथ्थू सदिच्छाबद्दल वाईट भावनेने बोलत असल्याचेही सांगितले होते.
सदिच्छा साने बेपत्ता झाल्यानंतर बँडस्टँडच्या समुद्रात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. तेव्हा जब्बार आणि मिथ्थू दारूच्या नशेत बरळत होते की, ‘बरं झालं पुरुषाचा मृतदेह सापडला, नाहीतर आपण दोघे जेलमध्ये गेलो असतो’. त्या दोघांचा संवाद ऐकल्याची कबुली एका साक्षीदाराने दिली आहे. याशिवाय, बँडस्टँड परिसरात असणाऱ्या एका पंचतारांकित हॉटेलच्या तीन सुरक्षारक्षकांनीही महत्त्वाचा जबाब दिला आहे. सदिच्छा बेपत्ता झाली त्यादिवशी दोघेही जण खडकांच्या दिशेने एकत्र गेले होते, पण परत येताना मिथ्थू एकटा होता, असे या सुरक्षारक्षकांनी पोलिसांना सांगितले.