राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना २० जून १९९९ साली झाली. पुढच्या वर्षभरात म्हणजेच १० जानेवारी २००० रोजी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. पक्षाने पुढची १३ वर्ष कसून मेहनत केली. लोकप्रतिनिधी निवडून आणण्यावर भर दिला. पण देशात मोदी लाट आली आणि शरद पवारांचा करिश्मा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर कमी झाला. पुढची नऊ वर्ष पक्षाची कामगिरी डळमळीत होत गेली. २०१४ नंतरच्या कामगिरीमुळे तर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आला. नागालँडचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन सुद्धा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकत नाही, असं नमूद करत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलाआहे.
राष्ट्रवादीचा निवडणूक प्रवास कसा राहिला?
-१९९९ ला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १३२ जागा लढवल्या, त्यातील एकूण ८ उमेदवार निवडून आले होते
६ महाराष्ट्रातून तर मेघालयमध्ये १, मणिपूरमधून १ खासदार निवडून आलेला
-२००४ ला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ३२ जागा लढवल्या, त्यापैकी ९ उमेदवार निवडून आलेले मात्र महाराष्ट्राबाहेर एकही उमेदवार निवडून आला नव्हता.
-२००९ ला राष्ट्रवादीने लोकसभेत ६८ उमेदवार उतरवले मात्र ९ उमेदवार निवडून आले होते, त्यापैकी ८ महाराष्ट्रातून तर मेघालयमधून १ खासदार निवडून आलेला
-२०१४ ला आलेल्या मोदी लाटेचा मोठा तडाखा महाराष्ट्रात संयुक्त पुरोगामी आघाडीला बसला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून फक्त ४ खासदार निवडून आले होते
-२०१९ ला राष्ट्रवादीने ३४ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी फक्त पाच उमेदवार निवडून आले, ४ खासदार राज्यसभेत निवडून गेले
-सध्या ५४३ सदस्य संख्येपैकी राष्ट्रवादीचे फक्त ५ खासदार आहेत
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी पक्षांना कोणते निकष पाळावे लागतात?
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ६ टक्के मतं, चार किंवा अधिक राज्यांमध्ये मिळवली पाहिजेत.
- लोकसभा निवडणुकीत चार जागांवर त्या पक्षाला कोणत्याही राज्यात विजय मिळवता आला पाहिजे.
- लोकसभा निवडणुकीत २ टक्के जागांवर विजय मिळवता आला पाहिजे आणि ते विजयी उमेदवार तीन वेगवेगळ्या राज्यातून विजयी झालेले असणं आवश्यक आहे.
- चार राज्यांमध्ये संबंधित पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा असणं आवश्यक आहे.