यावर्षी नेहमीप्रमाणे यात्रोत्सवादरम्यान सकाळी सहा वाजता पायी कावडीची मिरवणूक निघेल. आठ वाजता गंगाजलाने नाथांना अभिषेक होईल. या वेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी मान्यवरांच्या हस्ते महाआरती होईल. सालाबादप्रामाणे सायंकाळी काठ्यांची मिरवणूक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा भरणार आहे.
देवस्थान ट्रस्टच्यावतीने यात्रोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या वतीने माळीवाडा बसस्थानकापासून स्पेशल बसची व्यवस्था होईल. आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. त्या दिवशी एकादशी असल्याने फराळाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारची आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप होईल. यात्रोत्सवादरम्यान भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी आणलेला ध्वज रथावर लावला, बजरंगबलीचा रथ शेकडो महिलांनी ओढला
देवस्थानमुळे ग्रामविकास
गेल्या सुमारे २० वर्षांपासून देवस्थानजवळ विकासकामे सुरू झाली. तेव्हापासून आगडगाव हे राज्याच्या नकाशावर झळकले. सध्या सुमारे दोनशे कुटुंबांना देवस्थानच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकला. प्रत्येक रविवारी प्रसाद, नारळ, हार-पानफुले, खेळण्या, पेढे आदींची दुकाने थाटतात. परिसरातील शेतकरी भाजीपाला, कडधान्य घेऊन तेथे विकतात. जेवण वाढण्यासाठी युवक, भाकरी तयार करण्यासाठी महिलांना रोजगार उपलब्ध होतो. प्रत्येक रविवारी सुमारे आठ ते दहा हजार भाविक येत असल्याने रीक्षा, टेम्पो आदी वाहनांची वर्दळ होते. त्याद्वारे युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूणच देवस्थानमुळे गावचा चेहरा बदलला आहे. परिसरात असलेल्या भव्य मंगलकार्यालयात पंचक्रोशितील गावांमधील विवाह अत्यल्प खर्चात होतात. भव्य अन्नछत्रालय, भक्तनिवास, देवस्थानची बस, रुग्णवाहिका आदींमुळे ग्रामस्थांनाही त्याचा विविध उपक्रमांसाठी, अत्यावश्यक सेवेसाठी फायदा होतो.